

Pune News, 19 Jul : गेल्या काही काळापासून विविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील शिक्षकांच्या पाठीवर शिक्षण विभागाने आता आणखीन एक नवे 'टास्क' दिले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अध्यापन आणि प्रशासकीय कामकाज प्रभावी करण्यासाठी राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी 'शिक्षकांसाठी एआय साथी' हा ऑनलाइन अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.
हा कोर्स ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करावा, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी दिले आहेत. मात्र, आधीच विविध सरकारी कामांमध्ये व्यस्त असलेल्या शिक्षक वर्गातून या नव्या अनिवार्य कोर्समुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आधीच कामांचा डोंगर, त्यात नव्या 'टास्क'ची भर
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिक्षक वर्ग केवळ शाळा सांभाळत नसून, त्यांच्यावर सरकारी कामांचा मोठा ताण आहे. मतदान पडताळणी निवडणूक ड्युटी, मतदार याद्या अद्ययावत (SIR) करणे आणि जनगणनेची कामे यांमध्ये शिक्षक मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहेत.
या राष्ट्रीय आणि प्रशासकीय कर्तव्यांमुळे शिक्षकांना आधीच अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत, आता डिजिटल प्रशिक्षणाचा हा नवीन 'टास्क' अनिवार्य करण्यात आला आहे.
दीक्षा' पोर्टलवर अभ्यासक्रम; ३१ ऑगस्टपर्यंतच प्रवेश
'एससीईआरटी' आणि 'कोटक एज्युकेशन फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला असून, तो 'दीक्षा' पोर्टलवर उपलब्ध आहे. या कोर्सचे उद्घाटन १४ जुलै २०२६ रोजी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कोर्ससाठी ३१ ऑगस्ट २०२६पर्यंत प्रवेश (नोंदणी) घेता येणार असून, ३० सप्टेंबर २०२६ ही कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. शिक्षकांना 'दीक्षा' ॲप किंवा www.diksha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन हा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.