
Pune News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौर्यावर होते. त्यावेळी पुणे शहरातील अखंड मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पुणे दौर्यावर होते. पुणे विमानतळावर नागपुरकडे जात असताना मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेचे अनिकेत देशमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी या प्रकरणात लक्ष घातले असून सर्वांना नीट करणार, कोणालाही सोडणार नाही. असे सांगत या प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत येथील आमदाराला मंत्री करू नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांच्याकडे नाव न घेता धनंजय मुंडेंबाबत केली होती.
दरम्यान, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह विरोधकांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.