Pune News, 27 May : पुण्यातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सारसबाग गणपती मंदिर पुढील दोन दिवस भाविकांसाठी बंद राहणार आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मंदिर आणि सारसबाग परिसर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या बंदच्या कारणावरून आता पुण्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
सुरुवातीला मंदिराच्या डागडुजीसाठी हे मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आता थेट पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींवर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली असून, सोशल मीडिया टीमच्या चुकीमुळे हा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट केले आहे.
काल सारसबाग मंदिर बंद राहणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आज महापौर मंजुषा नागपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंदिर बंदचा निर्णय हा पालिका प्रशासनाचा किंवा आपला नसून तो पोलिसांनी घेतला असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. "सारसबाग मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संपूर्णपणे पुणे पोलिसांनी घेतला आहे. महापौर म्हणून मी फक्त ही माहिती पुणेकरांपर्यंत पोहोचवली. आमच्या सोशल मीडिया टीमकडून सुरुवातीला एक चूक झाली होती.
माझ्या प्रभागातील एका उद्यानाच्या डागडुजी संदर्भातील पोस्ट त्यांनी चुकून सारसबाग मंदिरासाठी पोस्ट केली. मात्र, चूक लक्षात येताच ती दुरुस्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ तारखेला मंदिर बंद राहणार आहे," अशी माहिती महापौर नागपुरे यांनी दिली.
सारसबाग परिसरात गेल्या वर्षी ईदच्या निमित्ताने काही वाद किंवा नमाज पठणाचा प्रकार घडला होता का? आणि त्याच पार्श्वभूमीवर यंदा खबरदारी म्हणून मंदिर बंद ठेवले जात आहे का? असा प्रश्न महापौरांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. "कॅलेंडरनुसार ईद आज आहे आणि ईदची सुट्टीही आजच आहे. आज सारसबाग बंद नाही, ते नियमित सुरू आहे. हा पूर्णपणे लॉ अँड ऑर्डरचा, कायदा आणि सुव्यवस्था विषय आहे.
मागच्या वर्षी या ठिकाणी काही वाद झाला होता किंवा नमाज पठण झाले होते, असा कोणताही विषय माझ्या कानावर आलेला नाही आणि त्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. पुणे पोलीस अत्यंत सक्षम आहेत. त्यांच्याकडे काही गोपनीय माहिती आली असावी, ज्या आधारे कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असेल," असे महापौरांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला डागडुजीचे कारण देणे आणि नंतर पोलिसांच्या आदेशाचे कारण पुढे करणे, यावरून महापौरांवर 'यू-टर्न' घेतल्याची टीका होऊ लागली आहे. यावर त महापौर म्हणाल्या, "मी कोणताही यू-टर्न घेतलेला नाही. ती पोस्ट आमच्या ऑफिसच्या लोकांकडून चुकून झाली होती. माझ्या ही गोष्ट लक्षात आल्यावर मी तात्काळ फोन करून ती पोस्ट बदलण्यास सांगितली.
माझी यात काहीही चूक नाही, पुणे पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती देणे हेच माझे काम होते." एकंदरीत, सारसबाग मंदिर २ दिवस बंद राहणार हे आता स्पष्ट झाले असले, तरी पोलिसांना मिळालेली 'ती' गोपनीय माहिती कोणती? आणि सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर बंद ठेवण्याची वेळ का आली? यावर आता पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.