Manoj Jarange: ‘आझाद मैदानातून जरांगे का पळाले?’ पुण्यात येण्याआधीच रेखा कोंडे-ललिता तारखांनी डागली आरोपांची तोफ

Rekha Konde Lalita Tarakh Allegations on Manoj Jarange :मनोज जरांगे पाटील पुण्यात येण्यापूर्वीच रेखा कोंडे आणि ललिता तारख यांनी त्यांच्या आंदोलनावर गंभीर आरोप केले. आझाद मैदानासह अंतरवाली सराटीच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केले.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. मात्र, जरांगे पुण्यात दाखल होण्यापूर्वीच त्यांच्याविरोधात गंभीर आरोपांची ठिणगी पडली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रेखा कोंडे आणि अंतरवाली सराटी येथील ललिता तारख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा लढा सुरू झालेला नाही, असा दावा रेखा कोंडे यांनी केला. लाठीचार्जच्या घटनेनंतर जरांगे यांच्यासारखे नेतृत्व पुढे आले आणि त्यानंतर गेल्या तीन वर्षांत समाजात केवळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले, असा आरोपही त्यांनी केला.

‘जरांगेंवर आरोप करणाऱ्यांना गायब केले जाते’

जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तींना गायब केले जात असल्याचा गंभीर आरोप कोंडे यांनी केला. सोशल मीडियावर जरांगे समर्थकांकडून मराठा समाजातील महिलांना ट्रोल केले जात असून, सुमारे पाच हजार जणांची ट्रोलिंग करणारी टोळी असल्याचा दावा त्यांनी केला. आपण स्वतःही मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह भाषेचा सामना केल्याचे कोंडे यांनी सांगितले. जरांगे यांच्या उपोषणातून मराठा समाजाला ठोस काहीही मिळाले नसल्याचा आरोप करत, ‘मराठा समाजाच्या विश्वासाची माती जरांगेंनी केली,’ अशी टीकाही त्यांनी केली.

Manoj Jarange Patil News
Gram Panchayat Fund: ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

‘निवडणूक लढवायला सांगितले; नंतर माघार घेतली’

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात जरांगे यांनी समाजातील लोकांना निवडणूक लढविण्याचे आवाहन केले. त्यानंतर अनेकांनी नोकरीचे राजीनामे देऊन निवडणुकीचे अर्ज भरले; मात्र अचानक माघार घेण्यात आली, असा आरोप कोंडे यांनी केला.

जरांगे यांच्या आंदोलनाबाबत निर्णय घेण्याची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘अतिशहाणपणा आणि माजोर्डेपणामुळे आम्हाला आता समोर यावे लागले,’ असे त्या म्हणाल्या. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या मराठा समाजातील सुमारे ३५० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत, ‘या मृत्यूंची जबाबदारी नेमकी कुणाची?’ असा सवालही कोंडे यांनी उपस्थित केला.

Manoj Jarange Patil News
Maharashtra Government: ऑनलाईन पोर्टल ठप्प झाल्याने 'या' योजनांच्या अर्जांना मुदतवाढ; विद्यार्थ्यांनो अंतिम तारीख जाणून घ्या!

‘आझाद मैदानातून जरांगे का पळाले?’

जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत कोंडे यांनी आझाद मैदानातील आंदोलनाचा संदर्भ देत, ‘आझाद मैदानातून जरांगे का पळाले?’ असा सवाल केला. त्यांच्या आंदोलनामागे नेमकी भूमिका काय आहे, याबाबत समाजासमोर स्पष्टता आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गॅलेक्सी हॉस्पिटलमधील उपचार आणि वैद्यकीय अहवालाबाबतही कोंडे यांनी आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जरांगे यांच्या पसंतीच्या रुग्णालयात त्यांच्या मनाप्रमाणे अहवाल दिले जातात असा देखील आरोप त्यांनी केला आहे.

ललिता तारख यांचा ‘अंतरवाली’च्या वापराचा आरोप

ललिता तारख यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील आपल्या पूर्वीच्या भूमिकेचा संदर्भ देत गंभीर आरोप केले. पैठण फाट्यावर निवेदन देण्यासाठी आपण स्वतः गेले होते. आंदोलनासाठी आवश्यक साहित्यापासून इतर मदतीपर्यंत सर्व प्रकारचे सहकार्य केले. जरांगे यांच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी त्यांना वाचवण्यासाठी आपण आणि इतरांनी लाठ्या खाल्ल्या, असा दावा त्यांनी केला.

आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या बांधवांची जरांगे यांनी साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप तारख यांनी केला. ‘जरांगे यांनी अंतरवाली सराटीतील नागरिकांचा आणि समाजातील बांधवांचा केवळ वापर केला,’ असा थेट आरोप त्यांनी केला.

पाटोदा आंदोलनातील GR समाजासमोर का आणत नाही?’

पाटोदा येथील आंदोलनात देण्यात आलेला शासन निर्णय समाजासमोर का आणला जात नाही, असा सवाल तारख यांनी उपस्थित केला. आपल्याला जरांगे समर्थकांकडून ट्रोल केले जात असल्याचे सांगत, आपण ट्रोलिंगविरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com