Pune News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांनी आपली जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यातच एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप,इन्कमिंग - आऊटगोईंग, बैठका, मेळावे यांनी विधानसभा निवडणूक रंगतदार असणार याचे संकेत दिले जात आहेत.
त्यातच एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करताना विरोधी पक्षातील बड्या नेत्यांवर गळ टाकण्यासाठीही चांगलीच फिल्डिंग लावली जात आहे.अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी मावळमध्ये काँग्रेसला धक्का देताना एक बड्या नेत्याला आपल्या पक्षात आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. मावळचे माजी तालुकाध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.किरण शंकरराव गायकवाड हे लवकरच अजित पवार गटाच्या वाटेवर आहे. त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांना पाठवला आहे.
महायुतीतीलच दोन हेवेदाव्यांनी आधीच पुण्यातील मावळ मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. तिथे भाजपच्या बाळा भेगडे यांनी अजित पवार गटाचे नेते आणि मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली तर आपण त्यांचं काम करणार नसल्याची भूमिका घेत वेळप्रसंगी बंडखोरीचीही तयारी दाखवली आहे. तर दुसरीकडे सुनील शेळके यांनी मावळवरचा दावा कायम ठेवताना आगामी विधानसभा आपण लढवणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे.
किरण गायकवाड यांनी ईमेलद्वारे आपला राजीनामा काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्याकडे दिला आहे.या राजीनाम्यामागे त्यांनी वैयक्तिक कारणास्तव देत असल्याचे स्पष्ट केले आहे. पण ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहेत. गायकवाडांच्या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत शेळकेंचं बळ वाढणार आहे.
काँग्रेसचा (Congress) एकनिष्ठ नेता म्हणून किरण गायकवाड यांची ओळखले जातात.विशेष म्हणजे त्यांनी 2014 ला मावळ विधानसभा निवडणूकही लढवली आहे.मात्र, सध्या ते पक्षात अॅक्टिव्ह नव्हते. गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात विविध जबाबदार्या सांभाळल्या आहेत.त्यात राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहराध्यक्षपद,मावळ तालुका युवकाध्यक्ष , तालुकाध्यक्ष,जिल्हा सरचिटणीस यांसारखी अनेक पदं मिळवली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.