

तळेगाव दाभाडे: मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मावळच्या तहसीलदारपदासाठी अनेक इच्छुक अधिकाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तहसीलदारांच्या नावाचीही जोरदार चर्चा महसूल वर्तुळात सुरू आहे. मात्र, अद्याप शासनाकडून कोणताही अधिकृत आदेश झालेला नसताना या नियुक्तीभोवती राजकीय रस्सीखेच रंगली आहे.
मावळच्या महत्त्वाच्या महसूल खुर्चीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्जीतील अधिकारी बसणार की भाजपच्या पसंतीस उतरणाऱ्या अधिकाऱ्याला संधी मिळणार, याकडे आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके करीत आहेत. तालुक्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय नियुक्त्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशीला महत्त्व असते. त्यामुळे नव्या तहसीलदाराच्या नियुक्तीबाबत आमदार शेळके यांची भूमिका काय राहणार, याबाबतही उत्सुकता आहे.
दुसरीकडे, राज्यातील महसूल खात्याची जबाबदारी भाजपकडे असल्याने या नियुक्तीत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. मावळमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शिफारशी आणि राजकीय समीकरणांमुळे ही नियुक्ती अधिक चर्चेचा विषय बनली आहे.
मावळ तालुका औद्योगिक, पर्यटन आणि बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार,औद्योगिक प्रकल्प, विविध विकासकामे, गौण खनिज, वतन जमिनी, कुलकायद्याशी संबंधित प्रकरणे, परवानग्या आणि अन्य महसुली व्यवहारांमुळे मावळचे तहसीलदारपद नेहमीच महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या पदावरील नियुक्तीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांचेही विशेष लक्ष असते.
विद्यमान तहसीलदार विक्रम देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मतदार याद्यांच्या कामामुळे बदलीची प्रक्रिया काही काळ रखडल्याची चर्चा होती. आता मतदार याद्यांशी संबंधित काम अंतिम टप्प्यात आल्याने तहसीलदारांच्या बदल्यांबाबत पुन्हा हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप सरकारकडून अधिकृत बदली अथवा नियुक्ती आदेश जारी करण्यात आलेला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तहसीलदाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की राजकीय ‘फिल्डिंग’मुळे दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला मावळच्या तहसीलदारपदाची संधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. एकंदरीत, मावळच्या तहसीलदारपदाची खुर्ची ही केवळ प्रशासकीय नियुक्ती न राहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय प्रभावाची कसोटी ठरणार का, अशी चर्चा सध्या मावळच्या राजकीय आणि महसूल वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.