

Pune News: जवळपास गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या बालेवाडी कस्पटे वस्ती रस्त्याचे भूसंपादन रखडल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी महापालिकेने आता 92 कोटी रुपये जागा मालकांना देऊन ही जागा सक्तीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी सुमारे दोन महिने लागतील असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या भागात पाहणी करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात विकास आराखड्यातील रस्ते अस्तित्वात न आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. यापार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषाण या प्रभागातील मिसिंग लिंकबाबत सोमवारी महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम व अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यात पाटील यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केल्याने अधिकाऱ्यांनी आज या भागात पाहणी केली. यात प्रामुख्याने सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी सर्व मिसिंग लिंकचा समावेश आहे.
दरम्यान, या बैठकीत अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणातील तांत्रिक अडचणी, अतिक्रमणे याबाबत मंत्री पाटील यांना माहिती दिली. पण त्यावर चंद्रकांत पाटील यांचे समाधान झाले नाही. राज्य सरकारने आपल्याला निधी दिला आहे, तरीही तुम्हाला वेगात काम करता येत नाही का असा प्रश्न अधिकाऱ्यांना केला. ही कामाची पद्धत बरोबर नाही असे पाटील यांनी आयुक्तांना सांगितले. त्यावर आयुक्तांनी तत्काळ अतिरिक्त आयुक्तांना या भागातील मिसिंग लिंकबाबत पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जागा पाहणी केली.
पुणे आणि वाकडचा भाग जोडण्यासाठी बालेवाडी ते कस्पटे वस्ती या दरम्यान मुळा नदी वर सुमारे 10 वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला आहे. पण पुण्याच्या हद्दीत गेल्या 10 वर्षात प्रशासनाला जागा ताब्यात घेता आला नाही.
याठिकाणी आता सक्तीने भूसंपादन करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे हायस्ट्रीट ते कस्पटे वस्ती येथील 5.4 किलोमीटरपैकी 1.8 किलोमीटर जागेचे भूसंपादन राहिले आहे. त्यासाठी जागा मालकांना सुमारे 92 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे.
हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या भूसंपादन विभागाकडे सादर झाला आहे. संयुक्त जागा मोजणी ही झाली आहे. भूसंपादनाचा हा निधी जागा मालकांना देण्यासाठी निवाडा करण्यासाठी येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या मान्यतेनंतर जागा ताब्यात घेतली जाईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असे पथ विभाग आणि भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘‘कोथरूड मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास पाषाण, सुतारवाडी, बाणेर- बालेवाडी परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल. याचा थेट फायदा नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, आपत्कालीन सेवांना होणार आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास, वेळेची बचत होईल. त्यामुळे ही कामे वेगात झाली पाहिजेत.’’ - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.