

Ameya Khopkar : गेल्या काही दिवसांपासून मनसेची चित्रपट सेना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या रमेश परदेशी उर्फ मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातील स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांनी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष असलेल्या अमेय खोपकर यांच्याकडं लिखित राजीनामा देखील सोपवला होता.
या राजीनामा पत्रात त्यांनी पक्षांमध्ये काही बिभीषण आहेत, त्यामुळं पक्षाचे नुकसान होत असल्याचं नमूद केलं होतं. यापार्श्वभूमीवर हा बिभीषण नेमका कोण आहे? त्याचा शोध घेण्यासाठी अमेय खोपकर थेट पुण्यात आले आहेत. तसंच यानिमित्त त्यांनी चित्रपट सेनेतील पदाधिकार्यांच्या बैठका घेत झाडाझडती घेतल्याची माहिती मिळते आहे.
पुण्यातून आतापर्यंत वसंत मोरे, रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह बहुतांश नेत्यांनी स्थानिक पक्ष नेतृत्वावर टीका करत मनसे सोडली होती, त्यानंतर परदेशींनी देखील असाच आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये शाखाप्रमुखांच्या बैठका घेतल्या होत्या. या बैठकीला शाखाप्रमुख म्हणून परदेशी देखील उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरे यांच्या नजरेमध्ये परदेशी आले आणि राज ठाकरेंनी परदेशी यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्ट बद्दल विचारलं. परदेशी यांनी आरएसएसच्या संचलनाचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. याबाबत राज ठाकरे यांनी परदेशींना विचारलं आणि खडसावून सांगितलं की एकाच ठिकाणी राहा! भर बैठकीत राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर बैठकीत टाळ्या पडल्या होत्या. यामुळं खजील झालेले परदेशी बैठकीच्या ठिकाणावरून निघून गेले असल्याचा देखील सांगितलं जातं.
यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी परदेशी यांनी आपला राजीनामा अमेय खोपकर यांच्याकडे पाठवला आणि काही दिवसांतच भाजपत प्रवेश देखील केला. प्रवेश केल्यानंतर परदेशी यांनी काही आरोप केले आहेत. त्यानुसार राज ठाकरे यांना आपण केलेल्या पोस्टबाबत कोणीतरी हेतूपुरस्कार कान भरले असल्याचं सांगितले होतं. तसेच बैठकीमध्ये झालेला चर्चा ही अंतर्गत होती असं असताना देखील काही लोकांनी ही चर्चा मुद्दामून माध्यमांमध्ये घडून आणली. त्यामुळे पुणे मनसेत आणि त्या बैठकीमध्ये काही बिभीषण होते, त्यामुळेच आपण पक्ष सोडत असल्याचं परदेशी यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केलं होते. आपल्याला पक्ष सोडायला लावणारे हे बिभीषण शोधून काढणे आवश्यक आहे अन्यथा पक्षाचे आणखी नुकसान होईल असे मत परदेशांनी व्यक्त केलं होते.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज अमेय खोपकर यांनी पुण्यामध्ये चित्रपट सेनेची बैठक घेतली. या बैठकीला विशेषता पुण्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. अनेक दिवसांपासून चित्रपट सेनेची कोणतीही बैठक पुण्यामध्ये झाली नव्हती. मात्र, परदेशी यांच्या राजीनामा नंतर खोपकर यांनी ही बैठक घेतली. या बैठकीमध्ये परदेशी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या संभाषण हे बाहेर कसं आलं याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र त्यांनी परदेशी यांच्या बाबत बोलणं टाळले. परदेशी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. आता ते दुसऱ्या पक्षात गेले असल्याने मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही असं त्यांनी सांगितलं. परदेशी यांनी केलेला कोणत्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं नाही तसेच परदेशी यांच्यावर टीका करण्यात देखील त्यांनी टाळलं.
मात्र, यानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली. परदेशी यांनी पक्ष फोडला असल्याने त्यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करणं आवश्यक होतं. तसंच त्यांच्या टीकेला देखील उत्तर देणे आवश्यक होतं. खोपकरांनी असं करणं आवश्यक असल्याचं मत पदाधिकाऱ्यांनी खाजगीत व्यक्त केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.