राज ठाकरेंची भेट होताच वसंत मोरे म्हणाले, सगळ्या ऑफर संपल्या!

वसंत मोरे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
Raj Thackeray and Vasant More
Raj Thackeray and Vasant More Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी भेट घेतली. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेऊन राज ठाकरेेंनी आज तातडीने मोरेंना भेटीसाठी मुंबईला पाचारण केले होते. या भेटीनंतर मोरेंनी 100 टक्के समाधान झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Vasant More News updates)

वसंत मोरेंनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास ही भेट चालली. या भेटीनंतर मोरेंनी माध्यमांशी संवाद साधून आपण 100 टक्के समाधानी असल्याचे जाहीर केले. राज ठाकरेंनी उद्याच्या ठाण्यातील सभेचे आमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ठाण्याची सभा ही उत्तरसभा आहे. या सभेत राज ठाकरे हे अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. मला राज ठाकरेंनी या सभेला बोलावलं असून, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सांगितले आहे. मी आधीपासून सांगत होतो की मनसेत राहणार आहे.

पुणे शहराध्यक्ष पदावरुन दूर केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याची पुण्यातील त्यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आज त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि इतर काही पदाधिकारी उपस्थित होते. मोरे यांनी सुरवातीला शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर ते राज ठाकरेंना भेटले. मोरे हे मनसे सोडून इतर पक्षात जातील, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल या भेटीनंतर विचारताच मोरेंनी सगळ्या ऑफर संपल्याचे सांगितले. यामुळे ते मनसेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या भेटीआधी बोलताना मोरे म्हणाले होते की, मला सर्वच पक्षांकडून ऑफर आहेत. पण या ऑफर आजच आहेत असं नाही. पुण्यातील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी माझ्याबद्दल जे राज यांना जे काही सांगितलयं त्यामुळे मी प्रचंड तणावात आहे. गेल्या काही दिवसांपासून मला नीट झोपही लागत नाही. पक्षातील काही पार्टटाइम मंडळी राज ठाकरे यांना तक्रार करत आहेत. पण मी अजूनही मनसेत आहे आणि मनसेतच राहणार आहे. राज ठाकरे माझ्या मनात आहेत. आज त्यांना भेटून मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडणार आहे. वसंत मोरे पक्ष सोडणार नाही.

मशिदींवरील भोंग्यांबाबत राज यांच्या विधानाला विरोध करणारी भूमिका वसंत मोरेंनी घेतल्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर त्यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर रविवारी राज ठाकरेंनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाली, त्यानुसार मोरे आज राज ठाकरेंना भेटले आहेत. त्यामुळे आजच्या भेटीकडे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com