Amol Kolhe PA and Police : शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा स्वीय सहाय्यक (पीए) असल्याचे सांगून एकाने पोलिसांचीच फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्या तोतयाच्या पीएच्या नंदूरबार पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. पोलिसांनी तोतयास अटक करण्यासाठी नंदूरबार ते पालघर आणि तेथून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर गाठावे लागले.
रविकांत मधुकर फसाळे (३२, रा. मोरंडे, पोस्ट मोरचंडी, ता. मोखाडा, जि. पालघर) असे या तोतयाचे नाव आहे. त्याने नंदूरबार पोलिसांना (Nadurbar Police) गंडा घातला आहे. त्याने पोलिसांकडून खासदार कोल्हे यांचा पीए (प्रबोधचंद्र सावंत) असल्याचे सांगून एक हजार रुपये घेतले हा प्रकार गुरुवारी (ता. १ जून) घडला आहे.
दरम्यान, त्याने अशाप्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे. त्यातूनच या तोतयाला अटक केली. फसाळेकडे अनेक राजकीय नेते व पोलिस अधिकाऱ्यांचे नंबर मिळून आल्याचे नंदूरबार स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. (Crime News)
असा उघडकीस आला प्रकार
फसाळेने थेट नंदूरबारचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मोबाईलवर १ जूनच्या रात्री मेसेज केला. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा पीए असल्याचे त्याने त्यात नमूद केले. त्यामुळे एसपींनी त्याची तातडीने दखल घेतली. शहाद्यात अपघात झाला असून त्यांना मदत करण्याचा हा मेसेज होता. एसपींनी जनसंपर्क अधिकारी हेमंत मोहितेंना मदत करण्याचे सांगितले.
संबंधितांशी त्यांनी संपर्क साधला असता त्यांनी आपण प्रबोधचंद्र सावंत बोलत असून खा.कोल्हेंचे पीए असल्याचे सांगितले. अपघातातील जखमींना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेला डिझेल व जेवणासाठी पैशांची मागणी त्याने केली. त्यावर मोहितेंनी एक हजार रुपये फोन पे द्वारे दिले. यानंतर त्यांनी सकाळी या घटनेची माहिती घेतली असता जिल्ह्यात असा कुठलाही अपघात झाला नसल्याचे समजले. त्यामुळे आपण फसविले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार नंदुरबार पोलिसात फसवणूक व सायबर क्राइमअंतर्गत गुन्हा दाखल केला. (Marathi Latest News)
गुन्ह्याचे गांभीर्य ध्यानात घेऊन एसपींनी 'एलसीबी'ला कामाला लावले. त्यांनी तपासासाठी नाशिक व पालघर जिल्ह्यात पथक रवाना केले. तांत्रिक मदतीच्या आधारे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याच्या मोरचंडी गावात गेले. तेथे शोध घेतला फसाळे हा त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे गेल्याचे समजले. त्यानंतर पोलीस त्र्यंबकेश्वर तेथून त्याला अटक केली. खेडकर, एपीआय संदीप पाटील, हवालदार महेंद्र नगराळे, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, शोएब शेख या पथकाने ही कामगिरी केली.
'असे' प्रकार घडूच नयेत
या संपूर्ण प्रकरणी मोठा मनस्ताप सोसावे लागलेले खा. कोल्हे यांचे पीए सावंत यांनी खंत व्यक्त केली. 'सरकारनामा'शी बोलतना ते म्हणाले, "असे प्रकार घडूच नयेत. अशा घटनांमुळे लांडगा आला रे...सारखी गत होईल. त्यामुळे खरी मदत लागणारे वंचित राहतील. लोकप्रतिनिधी वा त्यांच्या पीएच्याच नावाने फसवणूक झाली, तर पोलीस अशा प्रकरणात तत्पर मदत करण्यास धजावतील का?"
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.