

Pune News : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले असताना, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आंदोलनाबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांची बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या असून, उर्वरित विषय चर्चेच्या माध्यमातून मार्गी लावता येऊ शकतात, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या जवळजवळ सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्रही अनेकांना मिळाले आहेत. काही मागण्या न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे चर्चेतून प्रश्न सोडवता येऊ शकतात.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. देशभरातून नागरिक गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत येत असताना त्याच काळात आंदोलन केल्यास उत्सवाच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र गणपतीच्या दिवसांत मुंबईत जाऊन आंदोलन करू नये असे आवाहन त्यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगताना पाटील यांनी जरांगे पाटील यांनी दहा-बारा प्रतिनिधी पाठवावेत, असे म्हटले आहे. “मंत्रालयात किंवा संभाजीनगरला चर्चा करू. तुम्हाला यायचे नसेल तर दहा-बारा लोक पाठवा. आकडेवारी घेऊन बसू आणि सरकारला काय करता येते, काय करता येत नाही, हे स्पष्टपणे पाहू,” असे त्यांनी सांगितले.
आपण मराठा समितीचे अध्यक्ष राहिलो असून या विषयाशी संबंधित अनेक आकडेवारी आपल्याकडे असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे मराठा समाजातील युवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबतही सरकारने कारवाई केली आहे. राज्यभरात १,३७३ गुन्हे मागे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. आत्महत्या केलेल्या कुटुंबांतील मोठ्या संख्येने पात्र व्यक्तींना नोकरी देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी आढळणाऱ्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनेकांनी निवडणुकाही लढवल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह तत्कालीन सरकारांच्या भूमिकेवरही चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. १९६० पासून राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. मंडल आयोगाच्या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते; त्यावेळी मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यात आला नाही, असा दावा त्यांनी केला.
२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आणि तो मुंबई उच्च न्यायालयात टिकला; मात्र पुढे सर्वोच्च न्यायालयात तो टिकला नाही, असा संदर्भ देत पाटील यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर होणाऱ्या टीकेवर प्रश्न उपस्थित केला.
“मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत मराठा समाजाचे हित पाहून आंदोलन केले आहे. त्यांना कोणी चालवू शकत नाही. मात्र आंदोलनाच्या आडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणारे काही लोक असू शकतात,” असा दावा पाटील यांनी केला.
जरांगे पाटील यांचे आंदोलन यापूर्वी राजकीय कारणांनी प्रेरित नव्हते, असे सांगतानाच आता या आंदोलनाने कुठेतरी थांबण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. “जे मिळाले आहे, त्याची अंमलबजावणी कशी होईल हे पाहणे गरजेचे आहे. चर्चा करून पुढचा मार्ग काढता येईल,” असे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तब्येतीचाही विचार करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. “त्यांनी उपोषण मागे घ्यावे. जिथे आहेत तिथेच थांबून चर्चा करावी. स्वतःला त्रास करून घेऊ नये,” असे ते म्हणाले.
जरांगे पाटील यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगत पाटील यांनी संयमाने संवाद साधण्याचे आवाहन केले. “आपण जे बोलतो ते नीट बोललो तर अनेक गोष्टी साध्य होतात. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी खूप काम केले आहे. त्यांच्यावर आगपाखड करणे योग्य नाही,” असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.