Pune News : पुण्यातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवित एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही अभियंतांचा जागीच मृत्यू झाला. हा मुलगा धनिकाचा असल्याने त्याला वाचविण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न केले. त्यामुळे कोर्टाने या मुलाचा जामीन मंजूर केला. या प्रकारामुळे समाजमाध्यमातून जोरदार प्रतिक्रिया उमटत असून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कल्याणीनगर भागात घडलेल्या या हिट अँड रन प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी थेट पुण्यात दाखल झाले. पोलिस आयुक्त कार्यालयात सप्राईज व्हिजिट देत फडणवीस यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत फडणवीस यांनी गृह खात्याची बाजू मांडली. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीवर आक्षेप घेत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून काही प्रश्न विचारले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार धंगेकर यांनी हिट अँड रन प्रकरणाच्या एफआयआर फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यामध्ये पोलिसांनी सुरूवातील या एफआयरमध्ये कलम 304 लावलं नसून फक्त 304 अ लावल्याचा दावा केला. पण फडणवीसांनी सुरुवातीपासून कलम 304 लावल्याचे सांगितले. यावरून आमदार धंगेकरांनी फडणवीस यांना प्रश्न विचारले. पहिल्यांदा 304 चा उल्लेख का नव्हता. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आणि तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304 अ सोबतच 304 हे कलम लावण्यात आले.पोलिस प्रशासन आणि बिल्डरला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का? असे प्रश्न आमदार धंगेकर यांनी उपस्थित केले होते. त्यावर भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मोहोळ म्हणाले, 'साप-साप' म्हणून 'भुई धोपटणे' हे धंदे सोडून द्या. लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिले आणि या प्रकरणात देखील तेच. पोलिस स्टेशन स्तरावर कोणत्याही घटनेत एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही मंगळवारी हेच सांगितले. या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच. ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी, कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत, अशा शब्दात मोहोळ यांनी धंगेकरांना सुनावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.