मला काहीही माहिती नाही! कोरेगाव भीमा दंगलीवर पवारांचा खुलासा

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगासमोर पाच मे रोजी शरद पवार यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या (Koregaon Bhima Case) चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला असून आयोगासमोर पाच मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्याआधी पवारांनी आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या घटनेविषयी आपल्याला काहीही माहिती नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

शरद पवार यांनी 18 सप्टेंबर 2018 रोजी आयोगासमोर पहिलं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्याच प्रतिज्ञापत्राला जोड म्हणून पवारांनी 11 एप्रिल रोजी दुसरं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2018 रोजी घडलेल्या घटनेविषयी आपल्याला काहीही माहिती नाही. दुर्देवी घटनेमागे कोणताही राजकीय अजेंडा किंवा हेतूविषयी माझे कुणावरही आरोप नाहीत, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Sharad Pawar
आपण महाराष्ट्रात राहतो! अजितदादांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण

माझा सार्वजनिक जीवनातील एकंदरीत अनुभव आणि माहितीच्या आधारे आयोगाला मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पवारांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी राजद्रोहाच्या कायद्यासह इतर अन्य कायद्यांमध्येही सुधारणा सुचवल्या आहेत. या प्रकरणात लावलेल्या विविध कलमांबाबत त्यांनी बदल सुचवले आहेत. कायद्यांमध्ये नेमके कोणते बदल करावेत, याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. दंगल किंवा दंगलसदृश्य स्थिती उदभवल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची ताकद वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेतील (सीआरपीसी) तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगासमोर जबाब नोंदवले जात आहेत. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत. या आयोगाने शरद पवार यांना समन्स पाठवले आहे. त्यांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावलं आहे. कोरेगाव भीमा येथील हिंसाचार हा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं विधान शरद पवार यांनी केले होते.

Affidivit
AffidivitSarkarnama

त्यानंतर अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी केली होती. येत्या ५ मे रोजी शरद पवार यांना जबाब नोंदवला जाणार आहे. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील आयोगाच्या दालनात पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे समजते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा शरद पवार यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार होती. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधिक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले होते. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जबाब नोंदवण्यासाठी आयोगाने त्यांना बोलावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com