Pune : विधीमंडळाच्या साऱ्याच अधिवेशनात सत्ताधारी असो वा विरोधी बाकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे आक्रमकपणे लढतात. भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) भल्याभल्या नेत्यांविरोधात भाषणे ठोकून, पायऱ्यांवरून घोषणा देत चेतन आपला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आवाज बुलंद करतात. शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडापासून, युती सरकारविरोधात ५० खोक्यांच्या घोषणा, आंदोलनात आघाडीवर राहिलेले चेतन या अधिवेशनात तूर्त तरी येऊ शकणार नाहीत.
कारण, आजारी असल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आजारपणामुळे विधीमंडळाचे कामकाज 'मिस' करत आहे, लोकांचे प्रश्न मांडता येणार नाहीत. मात्र, ठणठणीत होऊन आला लढा पुन्हा ताकदीने उभारण्याचा इरादा चेतन यांनी हॉस्पिटलमधील बेडवरून केला आहे.
पुण्यातील हडपसरमधून पहिल्यांदाच आमदार झालेले चेतन अभ्यासू आहेत. चेतन पुणेकर असले; तरीही ते त्यांच्या भाषेला धार असते. पहिल्या दोन-अडीच वर्षांतील भाषणांनी चेतन यांनी सभागृहातील साऱ्यांची मने जिंकली होती. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांविरोधात लढणाऱ्याच्या यादीत आणि पक्षाची बाजू मांडणाऱ्यांच्या यादीत चेतन पहिल्या सहा जणांमध्ये आहेत.
आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी आपल्या ट्विटरवर सोमवारी (ता.१७) एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओ पोस्टमध्ये तुपे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. व्हिडिओतून त्यांनी लोकांशी संवाद साधला आहे. त्यांनी रुग्णालयात सुरु असलेल्या उपचाराची माहिती दिली आहे. तसेच पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले नसल्याची खंतही यावेळी आमदार तुपे यांनी व्यक्त केली आहे.
तुपे म्हणाले, गेले काही दिवस मी रुग्णालयात उपचार घेत आहे. अजूनही काही दिवस उपचार घ्यावे लागतील, तसेच विश्रांती घ्यावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मला फक्त एकच उणीव जाणवतेय, ती म्हणजे, अधिवेशानाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज मी मिस करणार असल्याचंही तुपे यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे.
मी आमदार झाल्यापासून अधिवेशनात माझ्या हडपसर(Hadapsar) मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले. पुणे शहराचे आणि जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याला मी प्राधान्य दिलं. जनहिताचे प्रश्न खूप तळमळीने मांडले, प्रसंगी आवाज उठवला. महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेण्यात मी यशस्वी झालो. विधानसभेतील भाषणे असोत, प्रश्नोत्तरे असोत, अथवा इतर काही, सगळ्या माध्यमातून मी कार्यरत राहिलो आहे. परंतु यावेळी मात्र प्रकृतीमुळे मी पहिल्या दिवशी तिकडे जाऊ शकत नाही याची मला निश्चितच खंत वाटतेय असे सांगत चेतन भावूक झाले.
आमदार चेतन तुपे म्हणाले, विधानसभेच्या त्या पायऱ्यांवरची आंदोलनं, घोषणाबाजी, नवीन कल्पकतेनं केलेली आंदोलनं करत लोकांना न्याय मिळवण्यासाठी काम करणं हे सगळं मला आठवतंय. अधिवेशन मी मिस करतोय. असं असलं तरी पुढील काही दिवसात औषधोपचार घेऊन लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मी विधीमंडळात उपस्थित राहीन. (Latest Marathi News)
या अधिवेशनातच लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मी लवकरच पुन्हा कामाला सुरुवात करेन असा विश्वासही आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केला. विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडणं हेच मी माझं कर्तव्य मानलं आहे. तसेच आपण सर्व माझी वैद्यकीय परिस्थिती समजूल घ्याल आणि सहकार्य कराल अशी आशाही तुपे यांनी यावेळी व्यक्त केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.