

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. गेल्या २६ वर्षांपासून असलेली शरद पवारांची साथ त्यांनी अखेर सोडली. पुणे महापालिकेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होऊ नये अशी प्रशांत जगताप यांची मागणी होती. त्यामुळं ते नाराज होते, पण सुप्रिया सुळे या युतीबाबत ठाम भूमिका घेत असल्यानं अखेर प्रशांत जगताप यांनी पक्षातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रशांत जगताप यांची नाराजी दूर करण्यात सुप्रिया सुळेंना यश आलं नाही.
प्रशांत जगताप म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार! २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्याही पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार"
आपल्या नाराजीवर आणि सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या बैठकीबाबत बोलताना जगताप म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं याबद्दल मी त्यांचे त्रिवार आभार मानतो. पण हे होत असताना माझ्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरुन मी हा निर्णय घेतला आहे. जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत पक्ष गेला तर मी राजीनामा देणार राजकारण थांबवणार असं विधान यापूर्वी प्रशांत जगताप यांनी केलं होतं. तेच आत्ताच्या राजीनाम्या मागचं कारण आहे का? यावर बोलताना जगताप यांनी सांगितलं की, यातून कुठलाच अर्थ काढू नका.
मला एक कुटुंब आहे मला स्वतःला एक राजकीय आयुष्य आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मी शरद पवारांसोबत राहिलो त्याची फक्त दोनच कारणं होती. त्यापैकी एक म्हणजे शतकापैकी एक नेता जन्माला येतो ते माझे श्रद्धास्थान लोकनेते शरद पवार यांची साथ द्यावी. पुरोगामी आणि सामाजिक ऐक्याची चळवळ शरद पवार चालवतात म्हणून मी त्यांची साथ देत होतो. पण हा निर्णय पक्षाच्या विरोधात नाही.
मी पक्षाला अडचणीत आणत नाही, कारण लोकशाहीत मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी पार्टी फोडून कार्यकर्त्यांना घेऊन चाललेलो नाही. हडपसर विधानसभा मतदारसंघातून मला १ लाख २७ हजार ६६८ मतदारांनी मतदान केलं होतं. इथं एका पक्षाच्याविरोधात या लोकांनी मला मतदान केलं, तिथल्या नागरिकांच्या नजरेत मी विलन ठरू नये. ज्या कार्यकर्त्यांनी आर्थिक राजकीय रसद नसतानाही माझ्या मागे उभे राहिले त्यांचीही अडचण होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. कृपया हा वाद अजित पवार आणि प्रशांत जगताप हा वाद लावू नका, असंही जगताप हे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.