शिरूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया विभागाचे सरचिटणीस अजय विजय हिंगे (Ajay Hinge) पाटील (वय ३५) यांचे दीर्घ आजाराने काल (ता.11 ऑक्टोबर) रात्री उशिरा निधन झाले.
एका अपघातातून आलेल्या अपंगत्वामुळे गेले १७ वर्षे ते अंथरूणाला खिळून होते. मात्र, या संकटाचे संधीत रूपांतर करीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोशल मिडीयाचे अत्यंत प्रभावी काम केले. (Ajay Hinge Passes Away, Latest News)
अजय हिंगे यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ , चुलते असा परिवार आहे. न्हावरे (ता. शिरूर) येथील रहिवासी असलेले हिंगे यांना १७ वर्षांपूर्वी एका अपघातात अपंगत्व आले. त्यातून कंबरेखालील भागाच्या संवेदना हरपल्याने जागेवर पडून राहणे नशिबी आले. मात्र, त्यांनी या अपंगत्वावर मात करीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांचा व विशेषतः शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या कार्याचा प्रचार - प्रसार करण्याचे काम प्रभावीपणे केले. त्याचबरोबर समाजप्रबोधनात्मक लेख, विचार यांचाही ते वेळोवेळी प्रचार- प्रसार करीत होते. गेले १७ वर्षे त्यांनी अविरत हे काम केले.
त्यांच्या या प्रभावी कामाची दखल खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वेळोवेळी घेतली. पवार साहेबांच्या न्हावरे येथे झालेल्या सभेस उपस्थित राहण्याची अतिव इच्छा व्यक्त केल्याने अजय हिंगे यांना स्ट्रेचरवरून सभास्थानी आणण्यात आले होते. त्यावेळी पवारसाहेबांनी त्यांचा हात हातात घेऊन आस्थेने विचारपूस केली व तब्बेत सांभाळण्याचा सल्ला दिला. अजित पवारांसह सुप्रिया सुळे व डॉ. कोल्हे यांनी तर वेळोवेळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करतानाच ते करीत असलेल्या कार्याबद्दल शाबासकी दिली होती.
स्वयंचलित व्हीलचेअर खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी त्यांना दिली होती. त्यातून ते बरेचसे स्वयंपूर्ण झाले होते. घराच्या परिसरात फिरणे, घरच्या शेतशिवारात फेरफटका मारणे, अशा हालचाली वाढल्या होत्या. मात्र, गेल्या महिन्यात न्यूमोनिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपासून तब्बेत आणखी ढासळल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान रक्तदाब खालावला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.