Pune News : काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या इमारतीसमोर झालेल्या आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्र्यांच्या आमदार पुत्राने महापालिकेतील कर्मचाऱ्यांबाबत अपशब्द काढले होते. त्यानंतर महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी याबाबत निषेध नोंदवत आंदोलन देखील केले होते. मात्र, याबाबतचा रोष कुठेतरी पालिका अधिकाऱ्यांमध्ये असल्याचं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मंगळवारी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर तीन कोटी 77 लाख रुपये करबाकीमुळे त्या हॉटेलला सील ठोकले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
महापालिकेकडून (Pune Carporation) मिळकतकर थकबाकी वसुलीवर भर देण्यात आला आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडून पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. मिळकतकर थकबाकी न भरणाऱ्या मिळकती या पथकाच्या माध्यमातून सील करण्यात येत आहे. त्यासोबतच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत थकबादीदारांना मिळकतीचा कर भरण्याचे आवाहन केले जात आहे.
शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे एक मॉल आहे. या मॉलची एकूण पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी एक कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली.
वरच्या दोन मजल्यांची तीन कोटी ७७ लाख थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण संबंधितांकडून त्यास दाद दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, पुणे महापालिकेच्या हद्दीतील 5 हजार कोटींची थकित मिळकतकर वसुलीकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यामधून 1983 कोटी रुपये थकीत मिळकत तर वसूल झाला आहे.
मंगळवारी दिवसभरात एकूण १६ मिळकती सील करून आठ कोटी रुपये वसूल केले आहेत. त्यामध्ये डेक्कन मॉलमधील आर डेक्कन मिळकत सील केली आहे. हॉटेलची तीन कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी आहे. निलेश राणे (Nilesh Rane) हे त्या मिळकतीचे प्रॉपरायटर आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा मिळकत कर थकीत असून वारंवार नोटिसा देखील दिल्या होत्या, असेही जगताप म्हणाले.