
Pune, 30 May : संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत सापडले आहेत. त्यातच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याने मुंडे काहींशी अस्वस्थ होते. त्यानंतर रिक्त मंत्रिपदावर ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांची निवड होताच धनंजय मुंडे यांनी थेट विपश्यना केंद्र गाठले आहे. त्यावर धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या पुणे दौऱ्यावर आहेत. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांना राज्य सरकार लाडक्या बहिणींकडे लक्ष देतेय. पण, तुम्ही लाडक्या भावाकडे म्हणजे धनुभाऊंकडे काय लक्ष देताय की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी स्मितहास्य करत उत्तर दिले.
चांगलं आहे. धनंजय मुंडे (Pankaja Munde) यांनी योग्य पर्याय निवडला आहे, त्यांना मनशांती मिळेल, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेची आता चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. त्यातच आता त्यांच्या एकेकाळच्या राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडेंनी ‘त्याने योग्य पर्याय निवडलाय,’ असे विधान केले आहे. आता त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
पंकजा मुंडे यांनी प्लास्टिक वापराबाबतही भाष्य केले. प्लॉस्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याची मोहिम हाती घेतली आहे. केंद्र सरकारने एकल प्लॉस्टिक वापर शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मदतीने आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. गणपतीपासून एखादी मोहीम सुरू केली तर सर्व निर्वघ्न पार पडतं, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मीक कराडला पाठीशी घातल्याचा आरोप होत होता. तसेच, मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक झाल्याचेही आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. एकीकडे वाल्मीक कराडवरून मुंडे यांच्यावर टीका हेात असतानाच त्यांची पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोहीम उघडली हेाती.
करुणा मुंडे शर्मांकडून होणारे आरोप, कोर्ट केसेस आणि दवाखाना यामुळे धनंजय मुंडे हे त्रस्त होते. तसेच, मंत्रिपदावरून त्यांना हटविण्यात आल्याने ते काहींचे अस्वस्थ होते. दुसरीकडे, मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळ यांची वर्णी लागली होती, त्यामुळे मुंडे यांच्या नाराजीत आणखी भर पडली. त्यानंतर मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील विपश्यना केंद्रात जाऊन मनःशांतीसाठी जाणे पसंत केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.