Pimpri BJP News : बोगस उपसूचना, स्वीकृत सदस्य अन् सभांचा गोंधळ! प्रदेश नेतृत्व टोचणार पिंपरी भाजपचे कान

Ravindra Chavan visit to Pimpri News : कोअर कमिटीच्या बैठकीत महापालिकेतील कारभाराचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षांतर्गत शिस्त व समन्वयाचे धडे दिले जाण्याची शक्यता आहे.
Devendra fadnavis, ravindra chavan
Devendra fadnavis, ravindra chavan Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येऊन अवघे सहा महिने झाले असतानाच पक्षांतर्गत गटबाजी, पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद आणि सर्वसाधारण सभांमधील गोंधळ पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाच्या रडारवर आला आहे. महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी भूमिका आणि सभांच्या कामकाजावरून भाजपच्या प्रदेश समितीने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी म्हणजेच उद्या पिंपरीत येणार असून, कोअर कमिटीच्या बैठकीत महापालिकेतील कारभाराचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षांतर्गत शिस्त व समन्वयाचे धडे दिले जाण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने दुसऱ्यांदा सत्ता मिळवित ८४ जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सात जागांची वाढ झाली असली, तरी स्थानिक नेत्यांमधील गटबाजीमुळे सुमारे १५ जागांचे नुकसान झाल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. त्यामुळे सत्ता मिळाल्यानंतर महापालिकेतील कामकाज सुरळीत चालविणे आणि संघटनेतील समन्वय राखणे, हे भाजपसमोरचे प्रमुख आव्हान झाले आहे.

महापालिकेतील सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे कामकाज आणि विविध विषयांवरील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या भूमिकांमधील विसंगती सातत्याने समोर येत आहे. भाजपचे चारही आमदार, महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यात महत्त्वाच्या प्रश्नांवर एकवाक्यता नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे महापालिकेतील सत्तेचा कारभार आणि पक्ष संघटनेतील समन्वय याबाबत प्रदेश नेतृत्वाने लक्ष घातले आहे. यापूर्वी प्रदेश समिती आणि शहराध्यक्ष काटे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना समन्वय राखण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यामुळे स्थानिक नेतृत्वाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.

बोगस उपसूचना, स्वीकृत सदस्यांवरून मतभेद

महापालिकेतील बोगस उपसूचनांचा मुद्दा, स्वीकृत नगरसेवकांची निवड, सर्वसाधारण सभांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह), मोशी दुर्घटना आणि शहरातील कचऱ्याचा प्रश्न या विषयांवर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्येच एकमत नसल्याचे या घटनांमधून दिसून आल्याने प्रदेश नेतृत्वाने त्याची दखल घेतल्याचे समजते. महापालिकेतील सभांचे कामकाज, निर्णयप्रक्रिया आणि महत्त्वाच्या प्रश्नांवरील भूमिका यामध्ये समन्वय राखण्याबाबत प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
Pune BJP : मंत्री मोहोळांच्या बैठकीनंतर भाजपमधील धुसफूस मिटली की वाढली; महापालिकेत पदाधिकाऱ्यांचे 'शीतयुद्ध' सुरूच?

कोअर कमिटीच्या बैठकीत कारभाराचा हिशेब

शहरातील संघटनात्मक आणि महापालिकेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय समन्वयाने घेण्यासाठी भाजपने (BJP) कोअर कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीच्या माध्यमातून महापालिकेतील कामांना प्राधान्य देणे, पक्षाची धोरणे निश्चित करणे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखणे अपेक्षित आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत महापालिकेतील कामकाजासह पक्ष संघटनेच्या उपक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे, सभांमधील कामकाज कसे चालवावे आणि पक्षाची भूमिका मांडताना एकवाक्यता कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
BJP News : जिल्हाध्यक्षाची खुर्ची अन् आमदारकीची संधी; मराठवाड्यात सात जणांना लागली लॉटरी...

नगरसेवकांना प्रशिक्षणातूनही शिस्तीचे धडे

दरम्यान, मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत ५ आणि ६ ऑक्टोबरला भाजप नगरसेवकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यासह वरिष्ठ नेत्यांकडून नगरसेवकांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि महापालिकेच्या कारभाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आणि सभांमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचा दौरा आणि नगरसेवकांचे प्रशिक्षण यांमधून पिंपरी-चिंचवड भाजपच्या कारभारात समन्वय आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाकडून केला जाणार असल्याचे चित्र आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
Devendra Fadnavis News: ...म्हणून भाजपमध्ये अस्वस्थता..! मुख्यमंत्री फडणवीस घेणार पुणे अन् पिंपरीतील नगरसेवकांची ‘शाळा’

याबाबत बोलताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी पिंपरीला येणार आहेत. ते कोअर कमिटीची बैठक घेणार असून, महापालिकेतील कामकाज आणि पक्ष संघटनेच्या उपक्रमांचा आढावा घेणार आहेत.

पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, 'शहर पातळीवरील पक्षांतर्गत शिस्त आणि समन्वय राखण्यासाठी कोअर कमिटी केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि महापालिकेच्या कारभाराचे धडे देण्यासाठी भाजपकडून निवासी प्रशिक्षण लवकरच आयोजित केले जाणार आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com