PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘सूर्यवंशी पॅटर्न’चा धडाका; 7 महिन्यांत रेकॉर्डब्रेक सस्पेन्शन, 11 जणांना घरचा रस्ता

PCMC commissioner: पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात सात महिन्यांत ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. कारवाईनंतरही प्रशासकीय बेशिस्तीच्या तक्रारी कायम असल्याने नियंत्रणावर प्रश्न उपस्थित झाले.
PCMC
PCMCSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri Chinchwad news: कुणी कर्तव्यात कसूर केली, कुणावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली, तर कुणावर प्रशासकीय गोपनीयता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभारावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

अवघ्या सात महिन्यांत तब्बल ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत ‘सूर्यवंशी पॅटर्न’ची चर्चा रंगली आहे. मात्र, निलंबनाचा धडाका सुरू असतानाही काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कथित कामचुकारपणा आणि बेशिस्त सुरूच असल्याने आयुक्तांच्या कारवाईचा धाक नेमका कुणाला बसला, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य शासनाने ११ मार्च २०२६ रोजी डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यांनी १६ मार्च रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध गंभीर प्रकरणांत कारवाईचे सत्र सुरू झाले. फौजदारी गुन्हे, लाचलुचपत विभागाची कारवाई, कर्तव्यातील कसूर, निष्काळजीपणा आणि प्रशासकीय अनियमितता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ११ जणांना निलंबित करण्यात आले.

विशेष म्हणजे, यापूर्वीच्या आयुक्तांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई झाली नव्हती. त्याच महापालिकेत सूर्यवंशी यांच्या अवघ्या सात महिन्यांत ११ जणांवर कारवाई झाली. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हा इशारा मानला जात आहे.

कुणावर कोणत्या कारणाने कारवाई?

आयुक्तांनी १० एप्रिल रोजीच दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कर्तव्यात कसूर आणि निष्काळजीपणाप्रकरणी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक शेशेराव अटकोरे, तर प्रशासकीय कामकाजातील गोपनीयता भंग केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता संदीप हजारे यांना निलंबित करण्यात आले.

फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने २० मे रोजी अभिजीत गायकवाड यांच्यावर कारवाई झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक उमेश लोंढे यांना १५ जून रोजी निलंबित करण्यात आले.

PCMC
Yusuf Pathan news : पक्षांतर करणाऱ्या बंडखोर खासदाराला गुजरातमध्ये लॉटरी; तब्बल 14 वर्षे वादात असलेली सरकारी जमीन देण्याचा निर्णय

मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना १५ जुलै रोजी, तर अग्निशमन केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना १८ जुलै रोजी निलंबित करण्यात आले. या प्रकरणांत विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले.

एका महिला शिक्षिकेची छेड काढल्याच्या प्रकरणात दिलीप आडे यांना ८ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले. बांधकाम विभागातील कामकाजाच्या अनियमिततेप्रकरणी कार्यकारी अभियंता विजय सोनवणे आणि उपअभियंता अशोक मोरे यांच्यावर ११ सप्टेंबर रोजी कारवाई झाली. वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात मद्यपान केल्याच्या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांनाही निलंबित करण्यात आले.

सकाळी हजेरी, दिवसभर गायब; प्रशासनाचा धाक कुठे?

एकीकडे आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे महापालिकेतील प्रशासकीय बेशिस्तीच्या तक्रारीही कायम आहेत. काही अधिकारी-कर्मचारी आपल्या दालनात किंवा जबाबदारीच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याची चर्चा आहे. काही जण सकाळी हजेरी लावल्यानंतर गायब होतात आणि सायंकाळी पुन्हा हजेरी नोंदविण्यासाठी महापालिकेत येतात, असेही पालिका वर्तुळात बोलले जात आहे.

गंभीर गैरप्रकारांमध्ये निलंबनाचा बडगा उगारला जात असताना, रोजच्या कामकाजातील बेशिस्तीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे का? हा खरा प्रश्न आहे. कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतील, जबाबदारीच्या ठिकाणी सापडत नसतील आणि कामकाजात दिरंगाई होत असेल, तर त्याचा फटका थेट नागरिकांना बसतो.

PCMC
Nashik NMC: नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नवा वाद; भाजपकडून प्रक्रिया गुपचूप उरकरण्याचा डाव, काँग्रेसचा हल्लाबोल

११ जणांचे निलंबन; पण बेशिस्तीचे काय?

महापालिकेतील गैरप्रकारांवर कारवाई होणे आवश्यकच आहे. मात्र, केवळ काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करून प्रशासनातील बेशिस्त संपणार नाही. प्रत्येक विभागातील उपस्थिती, कामाचा निपटारा आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर नियमित देखरेख ठेवण्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com