

PCMC Seat Sharing Formula : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची शुक्रवारी (ता. 20) सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. सभागृहातील 128 संख्येनुसार 8 नगरसेवकांमागे एक ‘स्थायी’ सदस्य असे समीकरण आहे. यानुसार, भाजपचे 11, राष्ट्रवादीचे 4 आणि शिवसेनेचा 1 सदस्य समितीमध्ये असणार आहे. महापालिकेत शिवसेनेचे सहाच नगरसेवक आहेत. पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तडजोड केल्याने शिवसेनेच्या एका सदस्याला स्थायी समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. त्यात भाजपने बाजी मारून एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी विरोधी पक्ष ठरला आहे. आता महापालिका तिजोरीच्या चाव्या अशी ओळख असलेल्या स्थायी समिती सदस्यपदासाठी चढाओढ सुरू आहे. महापालिकेत 128 पैकी भाजपचे 84, राष्ट्रवादीचे 37, शिवसेनेचे 6 व भाजप पुरस्कृत 1 असे संख्याबळ आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, स्थायी समिती सदस्य संख्या 16 असते. एकूण सदस्य संख्येला 16 ने भागल्यास 8 सदस्यांमागे 1 स्थायी सदस्य ठरतो. स्थायी समिती सदस्य कोट्याचा विचार केल्यास भाजपच्या वाट्याला 10.50, राष्ट्रवादीला 4.62 आणि शिवसेनेला 0.75 सदस्य संख्या येते. एका अपक्षाने भाजपला साथ दिल्यास भाजपचा वाटा 10.62 होतो. पूर्णांकानुसार भाजप 11, राष्ट्रवादी 5 व शिवसेना 1 असे 17 संख्याबळ होते.
स्थायीचे 16 सदस्य असल्याने भाजपचे 11 चे गणित पूर्ण केले आहे. राष्ट्रवादीने 5 ऐवजी 4 सदस्य देण्याचे ठरले आहे. त्यामुळे शिवसेनेला एक जागा मिळण्याचे गणित आहे. या तडजोडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही दुजोरा दिला आहे. स्थायी समिती सदस्यपदासाठी आम्ही अर्ज मागवले आहेत. त्यानुसार चार जणांचे अर्ज आले आहेत. आमचे चार सदस्य स्थायी समितीमध्ये असतील, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेची 2017 ची निवडणूक 128 जागांसाठीच झाली होती. यात भाजप 77, राष्ट्रवादी 36, शिवसेना 9, अपक्ष 5 आणि मनसे एका जागेवर विजयी झाली होती. स्थायीमध्ये भाजपचे 11,राष्ट्रवादीचे 3, शिवसेना व अपक्षांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी होता. त्यावेळी अपक्षांनी भाजपला साथ दिली होती. आता भाजपचे संख्याबळ सातने आणि राष्ट्रवादीचे एकने वाढले असून, शिवसेनेचे तीनने घटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.