Pune Loksabha News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या दिग्गज नेत्यांची फळी प्रचारात उतरवली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने तर अबकी बार चारसौ पारचा नारा देत महाराष्ट्रात मिशन 45 निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, आता मोदींच्या प्रचारसभेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रचारसभा पुण्यामध्ये 29 एप्रिलला होणार आहे. यासाठी शिरूर,बारामती, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी मध्यवर्ती अशा भागात ही सभा घेण्याचं नियोजन सुरू होतं. त्यात शहरातील एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पण आता हे ठिकाण मोदींच्या सभेसाठी कमी पडण्याची शक्यता असल्याने हडपसर परिसरातील रेसकॉर्स येथे होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.
महायुतीच्या उमेदवारांसाठी पुण्यातील एसपी.कॉलेज येथे ही सभा घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. या सभेसाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. एसपी.कॉलेज या ठिकाणी 40 हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे. पण आता रेसकॉर्स येथे सभा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. बहुतांश सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या नेत्यांचे रोड शो, जाहीर सभा यांचे आयोजन केले जात आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी टाकली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर या दोन मतदारसंघातील लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवित आहेत. तर शिरूर मधून खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
दहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर सत्तेतदेखील सहभागी होत अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. महायुतीत सहभागी झालेल्या अजितदादांनी बारामती (Baramati) लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा ध्यास केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात घेण्यासाठी प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केले जात होते. पुण्यात सभा घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.