
Pune, 11 August : राजकीय पदाचा गैरवापर करून ज्येष्ठ शेतकऱ्याला पाच लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांसह अनोळखी पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्ष कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
प्रदीप नथु कांबळे (वय 47, रा. कोंढणपूर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या (RPI) नेत्याचे नाव आहे. प्रदीप कांबळे हे केंद्रीय मंत्री आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या प्रकरणी बाळासाहेब विश्वनाथ दुरकर (वय 61, रा. दुरकरवाडी-गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे, त्यानुसार राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ज्येष्ठ शेतकरी बाळासाहेब विश्वनाथ दुरकर यांच्या गराडे (ता. पुरंदर) येथील गट क्रमांक 1312 मधील शेतजमीन रिंगरोडसाठी संपादित झाली आहे. त्या जमिनीचा मोबदल्यापोटी बाळासाहेब दुरकर यांना सरकारकडून 78 लाख रुपये मिळाले आहेत. पण, जमिनीचा मोबदला म्हणून मिळालेली रक्कम माझ्यामुळेच मिळाली आहे, असा दावा करून प्रदीप कांबळे यांनी दुरकर यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणीची (extortion) मागणी केली.
सरकारकडून मिळालेल्या पैशातून मला पाच लाख रुपये द्यावेच लागतील. मला पैसे दिले नाही, तर तुला बघून घेतो, तुझ्यावर खोटी ॲट्रोसिटीची केस करतो, अशी धमकीही प्रदीप कांबळे यांनी दुरकर यांना दिली होती. कांबळे हे डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत दुरकर यांना वारंवार धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागत होते.
दरम्यानच्या काळात पाच ते सहा व्यक्तींना सोबत घेऊन प्रदीप कांबळे हे बाळासाहेब दुरकर यांच्या गराडे येथील घरीही पैसे मागण्यासाठी गेले होते, त्यावेळीही त्यांनी पैसे न दिले तर..अशी धमकीही दिली होती.
प्रदीप कांबळे यांच्याकडून देण्यात येणाऱ्या वारंवारच्या धमकीला कंटाळून बाळासाहेब दुरकर यांनी ता. 10 ऑगस्ट रोजी प्रदीप कांबळे आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांच्या विरोधात राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार राजगड पोलिसांनी प्रदीप कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. कांबळे यांच्या इतर साथीदारांचा तपास करण्यात येत आहे.
या बाबत राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी तपास करत आहेत. राजगड पोलिसांच्या वतीने या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रदीप कांबळे यांनी आणखी कोणाला खंडणी मागून दमदाटी व धमक्या दिल्या असतील, तर संबंधित नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.