Pratap Sarnaik News : रिक्षांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे व्यवसायावर होणार परिणाम यामुळे विविध रिक्षा संघटना, लोकप्रतिनिधी, पर्यावरणवादी यांच्याकडून नवीन परवाने देण्यास विरोध करण्यात येत होता. अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आजपासून (ता.९) नवीन परवाने देण्यास स्थगिती दिली आहे.
सरनाईक म्हणाले, आजपासून रिक्षाचे नवीन परवाने वाटप स्थगित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्र्यांशी यासंदर्भात आमचा पत्रव्यवहार सुरू होता. त्यांनी पत्राद्वारे निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिले आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा संघटना, पर्यावरणवादी आणि लोकप्रतिनीधी यांनी देखील ही मागणी केली होती.
भविष्यात ज्याला खरच गरज आहे, बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी परवाने देण्यासंदर्भात आम्ही बैठक घेऊन एसओपी तयार करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच आरटीओने आत्तापर्यंत १४ लाख परवाने दिले होते, अशी देखील त्यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, "२०१७ मध्ये सरकारने मुक्त परवाना धोरण सुरू केल्यामुळे रिक्षांच्या संख्येत अफाट वाढ झाली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड सारख्या शहरांमध्ये रिक्षेची संख्या गेल्या नऊ वर्षात तब्बल सहा पटीने वाढली.
पिंपरी-चिंचवडमध्ये जिथे ५,००० रिक्षा होत्या, तिथे आज ५०,००० रिक्षा धावत आहेत. तर पुण्यात ही संख्या ४०,००० वरून थेट १.५ लाखांच्या घरात पोहोचली आहे." यामुळे रिक्षा व्यवसायाला शिस्त लागेल आणि चालकांच्या उत्पन्नात वाढ होईल. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आम्ही राज्य सरकारचे आभार मानतो, असे देखील कांबळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर या निर्णयाबाबत म्हणाले की, हा निर्णय रिक्षाचालकांच्या उपजीविकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, आमच्या संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण लढ्याला यश आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य दिशेने टाकलेले पाऊल असून त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळण्यास मदत होईल.तसेच पुढील काळात रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबतही सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.