

Pune News, 13 May : पुणे महापालिकेत सत्तेची फळे चाखायला मिळून अजून चार महिनेही उलटले नाहीत, तोच सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कलहाचा 'सस्पेन्स' आता चव्हाट्यावर आला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी सोमवारी घेतलेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीने महापालिकेतील गटबाजीवर जणू शिक्कामोर्तबच झालं असल्याचं बोललं जात आहे.
कारण या महत्त्वाच्या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि उपमहापौरांनाच निमंत्रण नसल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खमंग चर्चा रंगली असून, भाजपमधील 'ऑल इज नॉट वेल'चे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, महापौरांनी अशी काही बैठक बोलावली आहे, याची साधी पुसटशी कल्पनाही या बड्या पदाधिकाऱ्यांना नव्हती असं देखील सांगितलं जात आहे.
महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यापासून नेत्यांमध्ये समन्वय राहील, अशी अपेक्षा होती; पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येक नेता आपली स्वतंत्र चूल मांडताना दिसत आहे. यापूर्वी महापालिकेच्या होर्डिंग धोरणावरून स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यात सगळं काही अलबेला समोर आले होते. त्यापूर्वी शहरातील अनधिकृत केबल काढण्यावरून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांमध्ये मतमतांतर असल्याचं समोर आलं होतं.
त्यानंतर आता महापौर नागपुरे यांनी कचरा प्रश्न, जुने वाडे आणि पार्किंगच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, मात्र यावेळी सभागृह नेते बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष भिमाले आणि उपमहापौर वाडेकर यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून गेली.
सत्तेच्या चाव्या हाती आल्यापासून हे तिन्ही नेते वेगवेगळ्या बैठकांचा धडाका लावत आहेत आणि पत्रकारांशी संवाद साधतानाही प्रत्येकाची स्वतंत्र 'प्रेस कॉन्फरन्स' भरत असते. त्यामुळे पक्षात नक्की चाललंय काय, असा प्रश्न आता कार्यकर्तेच विचारू लागले आहेत.
यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातही बैठकांवरून होणारी ओढाताण पुणेकरांनी अनुभवली आहे. याच नेत्यांचा कित्ता आता महापालिकेतील पदाधिकारी गिरवत असल्याचे चित्र आहे. पण या 'नेतेगिरी'च्या लढाईत प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.
"साहेबांच्या वेगवेगळ्या बैठका अटेंड करायच्या की कामाचा निकाल लावायचा?" असा संतप्त सवाल आता अधिकारी खासगीत विचारू लागले आहेत. कामांपेक्षा बैठकांचाच फार्स अधिक होत असल्याने प्रशासनात नाराजी असून, भाजपमधील ही गटबाजी आता महापालिकेच्या कारभाराला 'ब्रेक' लावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.