

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पुणे विधान परिषदेची निवडणूक आता ऐन रंगात आली असल्याचे पाहायला मिळत आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याकडे बहुमत असून ही पारंपारिक जागा आमची असल्याचा दावा करत महायुतीत ही जागा आम्हाला सुटावी, अशी मागणी करत आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील आमच्याकडे अधिकच संख्याबळ असल्याचे सांगत या जागेवर दावा केला आहे.
सध्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप (BJP) दोन्ही पक्ष निवडणूक लढण्यावर ठाम राहिले तर पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे आणि या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंगमेकर ठरणार आहे. कारण सध्याच्या आकड्यांच्या गणितावरून शिंदे यांची शिवसेना ज्या पक्षाच्या बाजूने उभी राहील त्याच पक्षाचा आमदार निवडून येईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता एक वेगळाच ट्विस्ट आलेला आहे कारण भाजपला किंवा राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा शिवसेनेने आपणच स्वतः रिंगणात करण्याची तयारी दर्शवलेली आहे.
पुण्यामध्ये नुकतीच वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये वरिष्ठ नेतृत्वाने पुण्यातील शिवसैनिकांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळप्रसंगी जर मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर आपण कशाही पद्धतीने मॅजिक आकडा गाठू शकतो. यापूर्वीही अशा प्रकारची किमया शिवसेनेने (Shivsena) केली आहे. त्यामुळे गाफील न राहता डायरेक्ट लढण्यासाठी तयार राहा, अशा सूचना वरिष्ठांकडून सेनेच्या नेत्यांना मिळाल्या आहेत.
पुणे विधान परिषद मतदारसंघात एकूण 867 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 798 निवडून आलेले, तर 69 नियुक्त सदस्यांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, 18 नगरपरिषद व नगरपंचायती तसेच 3 कॅण्टोन्मेंट बोर्ड आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्या लक्षात घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते.
867 सदस्यांपैकी तब्बल 370 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असून त्याखालोखाल भाजपची मतदार संख्या असून दोन्हींमध्ये फक्त आठ ते दहा जागांचा फरक आहे. अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले 68 मतदार निर्णय भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर ज्यांच्या मागे शिंदेंचे शिवसेना त्यांचाच आमदार असे सध्याचे गणित आहे. मात्र, आता शिवसेनेने दंड थोपटल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे टेन्शन वाढणार आहे.
'भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने गृहीत धरू नये'
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले, 'आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. त्या पद्धतीची सूचना जर वरिष्ठांकडून मिळाली आणि मैत्रीपूर्ण लढत होणार असेल तर आम्ही देखील या निवडणुकीत उतरण्यास सज्ज आहोत. मैत्रीपूर्ण लढतीत जादुई आकडा कसा मिळवायचा याची किमया यापूर्वीही शिवसेनेने करून दाखवली आहे. त्यामुळे सूचना मिळाल्यानंतर आम्ही जादुई आकडा मिळवण्यासाठी प्रयत्न करू तसेच मैत्रीपूर्ण लढतीमध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने मला गृहीत धरू नये, असे देखील रमेश कोंडे म्हणाले.