

Pune News, 25 Mar : पुणे महानगरपालिकेचे १५ हजार ६६९ कोटींचे बजेट स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केले. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणि तिजोरीच्या चाव्या श्रीनाथ भिमाले यांच्या हातात असल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना भरभरून निधी दिल्याचं समोर आलं आहे.
भिमाले यांनी आपल्या प्रभागात देखील मोठा निधी नेल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या मंगळवारी सादर झालेल्या अंदाजपत्रकामध्ये गटनेते, स्थायी समिती सदस्यांवर निधीची खैरात करण्यात आली आहे. महापौर, उपमहापौर यांच्यासह पालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते, स्थायी समिती सदस्यांना प्रभागासाठी सर्वात जास्त निधी देण्यात आले आहे. साधारणपणे प्रत्येक नेत्याला सुमारे ८ ते १२ कोटींपर्यंत बजेट दिले आहे.
तर भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला आपापल्या प्रभागासाठी साधारणपणे ५ कोटींचे बजेट दिले आहे. समाविष्ट गावातील भाजपच्या नगरसेवकांना ७ कोटींचे बजेट दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना सुमारे ४ कोटींचे बजेट दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येकी ३ कोटींचे बजेट देण्यात आले आहे.
तर प्रभाग क्रमांक एक मधील एक नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या अमोल बालवडकर यांना मात्र शून्य बजेट देण्यात आले आहे. भाजपशी पंगा घेतल्याने त्यांचं बजेट कट करण्यात आल्याचे तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. तर टेक्निकल चुकींमुळे त्यांना शून्य बजेट देण्यात आला असून पुढील कालावधीमध्ये त्यांना बजेट देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान आतापर्यंत महापालिकेत पडलेला प्रथेनुसार सर्वाधिक बजेट हे स्थायी समिती अध्यक्ष स्वतःलाच घेतो हे पूर्वीपासून दिसत आलेलं आहे. स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या प्रभागात बजेटच्या माध्यमातून प्रकल्पावर भर दिला आहे. श्रीनाथ भिमाले यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी ३५ ते ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
'स'यादीचे बजेट १ हजार ३०० कोटींपेक्षा जास्त
महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना प्रभागनिहाय साधारणपणे पाच कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नगरसेवकांना चार कोटी, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे.
याशिवाय, सर्व पक्षांच्या गटनेते आणि स्थायी समिती सदस्यांना त्यांच्या प्रभागासाठी प्रत्येकी सुमारे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या 'स' यादीचे एकूण बजेट १ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये विविध विकास कामे आणि तरतुदींना १५ टक्के कात्री लावण्यात आली आहे. यामुळे उपलब्ध झालेल्या निधीचा वापर नगरसेवकांच्या 'स' यादीसाठी करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.