

Pune News, 22 Feb : पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि स्थायी समितीचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आता संपली असून या सर्व खुर्च्यांवर भाजपचे नेते विसावले आहेत.
त्यामुळे आता सगळ्यांनाच स्वीकृत नगरसेवक पदाचे वेध लागले आहेत. तिकीट हुकलं, पराभव झाला, यंदा संधी मिळाली नाही, पक्षाने थांबण्याच्या सूचना दिलेले असे सर्वजण आपल्या पदरात स्वीकृत नगरसेवक पद पडावं यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत. पुणे महापालिकेमध्ये काही दिवसांमध्ये दहा स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.
हे नगरसेवक पालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार असणार आहेत. त्यामुळे भाजपचे 119 नगरसेवक निवडून आल्याने सर्वाधिक 7 स्वीकृत नगरसेवक हे भाजपचे असणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसच्या 1 कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे.
निवडून आलेल्या महापालिका सदस्यांप्रमाणेच स्वीकृत सदस्यांनाही महापालिकेकडे कोणतेही थकबाकी/देणी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त करणे अनिवार्य आहे. या सुविधेसाठी महापालिका प्रशासनाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत या माध्यमातून एकूण 193 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे हे 193 जण आपल्या पदरामध्ये स्वीकृत नगरसेवक पद पडेल याची आस लावून बसल्याचं बोललं जात आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या अनेक नेत्यांनी आपली वर्णी स्वीकृत नगरसेवक पदी लागेल यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. मात्र यापूर्वीच भाजप नेतृत्वाने पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेणार नाही असं स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी या पराभूत उमेदवारांनी अद्यापही प्रयत्न सोडलेले नाहीत.
दुसरीकडे भाजपकडून निवडण्यात येणाऱ्या सात स्वीकृत नगर सेवकांबाबतचे अधिकार हे पूर्णपणे स्थानिक नेतृत्वाला आहेत. त्यामुळे पुणे शहरातील प्रत्येक आमदार आणि खासदार हा एक नाव सुचवणार असून त्यानंतर त्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक मतदारसंघानुसार एक स्वीकृत नगरसेवक देण्याबाबत देखील वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहेत. त्यामुळे आमदार, खासदारांच्याच निकटवर्तीयांच्या गळ्यामध्ये स्वीकृत नगरसेवक पद पडण्याची दाट शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.