

PMC News: पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेतील एक अनुभवी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ही त्यांची सलग तिसरी टर्म आहे.यंदाच्या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या, त्यानंतर महापौरपदीही त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या राजकीय आणि व्यक्तीगत प्रवास जाणून घेऊयात
वडिलांची युद्धकाळातील अटक, घरावर कोसळलेला अडचणींचा डोंगर, बहिणीचे थांबलेले शिक्षण आणि नातलगांनी केलेली फसवूणूक या साऱ्या जखमा सोबत घेऊनही जिद्द, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि स्वप्नांचा हात सोडला नाही. नोकरी करत शिक्षण घेत अन् कुटुंबही सावरले, संकटांना न जुमानता स्वतःचे आयुष्य घडवले आणि आज त्या संघर्षालाच बळ बनवत पुण्याच्या महापौरपदावर पोहोचल्या आहेत मंजूषा नागपुरे. हे यश पदाचे नसून वेदनेवर मात करून घडलेले नेतृत्वाचे प्रतीक आहे.
प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी–माणिकबाग प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या मंजूषा नागपुरे यांची पुणे महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली. या निवडीनंतर ‘ सरकारनामा’च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी आयुष्यातील खडतर प्रवास उलगडला. आठवणी सांगताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते, मात्र शब्दांमधून आत्मविश्वास आणि ठामपणा जाणवत होता.
मंजूषा नागपुरे या मुळच्या धुळे जिल्ह्यातील. त्यांचा जन्म ठाण्यात झाला. वडील इलेक्ट्रिक अभियंता असून खासगी कंपनीत कार्यरत होते. शालेय शिक्षण मुंबईत सुरू असतानाच १९८८–८९ मध्ये वडिलांना कामासाठी कुवेतला पाठविण्यात आले. कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. सुरुवातीला नियमित पैसे येत होते; मात्र कुवेत–इराण युद्ध सुरू होताच परिस्थिती बदलली. वडिलांना अंधारकोठडीत डांबण्यात आले, संपर्क तुटला आणि कुटुंबाचा आधारच हरपला. घरखर्च भागवणे अवघड झाले. नातलगांनी फसवणूक केली, आईकडील सर्व काही विकावे लागले. अखेरीस मामाने आधार दिला.
परिस्थिती नाजूक असल्याने आठवीत शिकणाऱ्या बहिणीचे शिक्षण थांबले; मात्र अभ्यासात हुशार असल्याने मंजूषा यांचे शिक्षण सुरू राहिले. दहावीनंतर शिरूर येथे शिक्षण घेत असताना १९९५–९६ मध्ये त्यांनी इंग्रजी स्पोकन क्लासेस सुरू केल्या आणि घराला हातभार लावला. याच काळात वडिलांचा शोध सुरूच होता. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेकांना पत्रे पाठवली. अखेर १९९९ मध्ये रेडक्रॉस संस्थेच्या मदतीने वडील घरी परतले. अनेक वर्षांनंतर त्यांना पाहून आई बेशुद्ध पडली. पण आमच्या कुटुंबासाठी अनेक वर्षानंतर आलेला हा आनंदाचा क्षण होता. अंधार कोठडीत वडिलांना डांबण्यात आल्याने त्यांना फासरे काही आठवत नव्हते, बोलत नव्हते. वैद्यकीय उपचारानंतर ते चांगले होते.
महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सक्रीय सहभाग आणि २०१२ मध्ये भाजपकडून निवडणूक असा हा प्रवास सेवाभावातून घडला. आयुष्यामध्ये घरच्यांचे संस्कार जसे महत्वाचे ठरले. तसेच संघाने केलेले संस्कार माझे आयुष्य सावरण्यात उपयोगी ठरले. महापौर म्हणून केवळ पदाची शोभा न वाढवता महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण यावर ठोस व नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संघर्षातून घडलेले हे नेतृत्व आता पुण्याच्या विकासाला दिशा देणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.