Pune News : सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने आणि त्यानंतर शहराध्यक्षपद डावलल्याने भाजपातील काही स्थानिक वरिष्ठ नेते नाराज झाले होते. या वरिष्ठ नेत्यांची समजूत काढताना भविष्यात पक्षाने तुमच्यासाठी मोठा विचार केला असल्याचं सांगत या नेत्यांना महापौर पदाचं प्रलोभन देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तीन नेत्यांना आगामी महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदाचं आश्वासन देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
आता मध्यवर्ती भागातील काही प्रभावशाली नेत्यांसाठी खास तीन सदस्यांचे प्रभाग तयार करण्यात येतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे प्रभाग मुख्यतः कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघांत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर पदाचं आश्वासन दिलेल्या नेत्यांसाठी सेफ झोन बनवण्यात येतोय का? अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.
पुणे महापालिकेची आगामी निवडणूक 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीस होण्याची शक्यता असून, सध्या राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रभाग रचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेला 4 ऑगस्टपर्यंत प्रारूप प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर करावी लागणार आहे. 2022 च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या सुमारे 34.81 लाख असून, त्यासाठी 165 नगरसेवकांची तरतूद आहे.
प्रत्येक प्रभागामध्ये चार नगरसेवक असतील, अशी प्राथमिक मांडणी आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तीन किंवा पाच सदस्यांचे प्रभाग ठेवण्याचीही शक्यता आहे, विशेषतः जिथे भौगोलिक व लोकसंख्येचा समतोल साधणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पर्वती, कसबा आणि कॅन्टोन्मेंट या भागांतील काही अनुभवी आणि प्रभावशाली माजी नगरसेवकांना लक्षात घेता, त्यांच्यासाठी तीन सदस्यांचे प्रभाग तयार केले जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पुण्यात 165 जागांसाठी जर 39 प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे ठेवले, तर 156 सदस्यांचा समावेश होईल. उर्वरित 9 जागांसाठी प्रत्येकी तीन सदस्यांचे तीन प्रभाग तयार करावे लागतील. दुसरीकडे, जर 40 प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे ठेवले, तर 160 सदस्यांचा समावेश होतो आणि उर्वरित पाच जागांसाठी एक पाच सदस्यांचा प्रभाग ठेवावा लागेल. मात्र, अशा प्रभागाची लोकसंख्या सुमारे 1.20 लाख होऊ शकते, त्यामुळे त्यासाठी भौगोलिक आणि लोकसंख्येचा समतोल राखणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
दरम्यान, प्रभाग रचनेचे काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असून भाजपकडून आपल्याला हवे तसे प्रभाग तयार करण्यात येत असल्याचा आरोप नुकताच काँग्रेस कडून करण्यात आला आहे. या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात धाव देखील घेतली आहे. अशातच तीनच्या प्रभागाबाबत माहिती चर्चेत आल्याने राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.