PDCC Bank Election : एका ठरावाला 1 लाख? PDCC बँकेच्या निवडणुकीत 'भाव' फुटला; राष्ट्रवादीचा गड की भाजपचा सर्जिकल स्ट्राइक?

Pune District Central Cooperative Bank : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पीडीसीसी बँकेची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या सहकार क्षेत्रात भाजप किती ताकदीने शिरकाव करतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
PDCC Bank Election | Pune Cooperative Politics
PDCC Bank Election | Pune Cooperative PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 12 Sep : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. बँकेच्या २१ संचालक पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांचे प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी गावपातळीवर हालचाली वाढल्या असून, मतदार प्रतिनिधींच्या ठरावासाठी पैशांचा वापर होत असल्याची जोरदार चर्चा सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे.

काही तालुक्यांमध्ये एका मतासाठी हजारो रुपयांपासून लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहाराची चर्चा रंगली असल्याने निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे. पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी पात्र सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्राथमिक मतदार यादीतील माहितीनुसार बँकेशी संबंधित पात्र सभासद संस्थांची संख्या ७ हजार ६१७, तर वैयक्तिक सभासदांची संख्या १ हजार ६७९ आहे. त्यामुळे एकूण ९ हजार २९६ मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

परिणामी, प्रत्येक सोसायटीचा प्रतिनिधी आपल्या बाजूला वळविण्यासाठी राजकीय नेत्यांसह इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे 'अ' वर्गातील विकास सोसायट्यांची संख्या १ हजार ३७७ आहे. प्रत्येक तालुक्यातून ठराविक संख्येने संचालक निवडले जाणार असल्याने या सोसायट्यांच्या ठरावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर ‘ब’ वर्गातील १६१, ‘क’ वर्गातील १ हजार ७११ आणि ‘ड’ वर्गातील ४ हजार ३६८ पात्र संस्थाही निवडणुकीच्या गणितात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

गावकीच्या राजकारणाला आता सहकाराची जोड

पीडीसीसीची निवडणूक ही केवळ बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नसून जिल्ह्यातील सहकारातील राजकीय ताकद आजमावणारी निवडणूक मानली जाते. त्यामुळे गावपातळीवरील राजकीय समीकरणे, सोसायट्यांमधील गटबाजी आणि आगामी राजकीय गणित यांचा थेट परिणाम या निवडणुकीवर होणार आहे.

PDCC Bank Election | Pune Cooperative Politics
Ratnakar Mahajan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन

ठराव कोणाच्या बाजूने जातो, यावर पुढील राजकीय डावपेच अवलंबून असल्याने ‘ठरावासाठी फिल्डिंग’ला वेग आला आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय प्रतिनिधी निश्चित करण्याची प्रक्रिया २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सहकाराचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

भाजपची रणनीती महत्त्वाची ठरणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पीडीसीसी बँकेची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या सहकार क्षेत्रात भाजप किती ताकदीने शिरकाव करतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकारणावरही या निवडणुकीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने दोन्ही बाजूंनी मतदार प्रतिनिधींची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

PDCC Bank Election | Pune Cooperative Politics
Gramsevak Death : बीड हादरलं! अचानक बेपत्ता झालेल्या ग्रामसेवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

२२ सप्टेंबरपर्यंत ‘भाव’ आणखी वाढणार?

विकास सोसायट्यांचा ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी काही तालुक्यांत ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत भाव फुटल्याची चर्चा असून, काही ठिकाणी हा दर त्याही पुढे गेल्याचे बोलले जात आहे. ठराव दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू राहणार आहे. त्यातच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्रतिनिधींची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने आता फुटलेला भाव २२ सप्टेंबरनंतर आणखी वाढतो की राजकीय ताकदीपुढे पैशांचे गणित फेल ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com