

Pune PMC News : शहरातील महापालिकेच्या अॅमेनिटी स्पेस बीओटी तत्त्वावर देण्याचा जुना आणि वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितलं जात आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर लगेचच प्रशासनाने सुधारित प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर मांडण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वीही भाजपच्या सत्ताकाळात हाच प्रस्ताव आणण्यात आला होता, परंतु सर्वपक्षीय तीव्र विरोध आणि नागरिकांच्या मोठ्या रोषामुळे तो मागे पडला होता. आता हाच जुना प्रस्ताव नव्या नियमावलीचा मुलामा चढवून पुन्हा पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
महापालिकेकडे सध्या 800 पेक्षा जास्त अॅमेनिटी स्पेसेस उपलब्ध आहेत. बांधकाम नियमावलीनुसार, 20 गुंठे किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाच्या प्रकल्पांमध्ये सार्वजनिक उपयोजनांसाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. एकात्मिक बांधकाम विकास नियमावलीनुसार मैदान, प्रदर्शन ग्राउंड, सांस्कृतिक कार्यक्रम, बस-ट्रक टर्मिनस, पार्किंग, बायोडायव्हर्सिटी पार्क, उद्याने, संग्रहालय अशा 21 प्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांसाठी या जागांचा वापर करणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षात या जागांवर उभारलेल्या भाजी मंडया, बहुउद्देशीय हॉल यांसारख्या प्रकल्पांपैकी अनेक ठिकाणचे उपक्रम ठप्प आहेत. कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या वास्तूंचे व्यवस्थापन नगरसेवकांशी संबंधित संस्थांकडे असून, अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. आता या सर्व मिळकती बीओटी तत्त्वावर खासगी संस्थांकडे देण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. संबंधित संस्थेला ठराविक कालावधीसाठी विकास व संचालनाचा अधिकार देऊन नंतर तो प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करावा लागणार आहे.
प्रशासनाचा दावा आहे की, यामुळे विकास आणि देखभालीचा खर्च महापालिकेला करावा लागणार नाही, उलट व्यावसायिक वापरातून उत्पन्न मिळेल आणि नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील. मात्र या सेवांसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 2008 च्या नियमावलीचा आधार घेतला गेला होता; आता 2022 मधील सुधारित नियमावलीचा आधार घेऊन प्रस्ताव मांडण्याची तयारी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.