

Pune PMC News : पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीचे 12 सदस्य निवडताना भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. स्थायीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या श्रीनाथ भिमाले यांचा अपवाद वगळता अन्य इच्छुकांना समितीमध्ये यंदा स्थान दिले नाही. तसेच सर्वच पक्षांनी स्थायी समितीमध्ये जुन्या हद्दीतील उपनगरे, समाविष्ट गावातील 13 नगरसेवकांना संधी दिली आहे. तर राष्ट्रवादीने अमोल बालवडकर, काँग्रेसने प्रशांत जगताप यांना स्थायीमध्ये संधी देऊन भाजपची डोकेदुखी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर मंजूषा नागपुरे यांनी आज स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये भाजपचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. दरम्यान, पुढील सात दिवसात स्थायी समितीची निवडणूक होईल. भाजपमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले, अनिल टिंगरे, अजय खेडेकर, राजेंद्र शिळीमकर, धीरज घाटे यांच्यासह अन्य नगरसेवक इच्छुक होते. यात केवळ भिमाले यांना संधी मिळाली.
तसेच उर्वरित 11 नावे अंतिम करताना समाविष्ट गावे आणि मोठे प्रभाग असलेल्या भागातील नगरसेवकांना संधी दिली आहे. मध्यवर्ती भागातून विशाल धनवडे (प्रभाग क्रमांक 23), निशा मानवतकर (प्रभाग क्रमांक 7), श्रीनाथ भिमाले (प्रभाग क्रमांक 21) यांना संधी मिळाली आहे. तर रूपाली धाडवे (प्रभाग क्रमांक 39), कालिंदी पुडें (प्रभाग क्रमांक 14), जयश्री भूमकर (प्रभाग क्रमांक 34), रत्नमाला सावत (प्रभाग क्रमांक 4), प्राची अल्हाट (प्रभाग क्रमांक 41), मयूरी कोकाटे (प्रभाग क्रमांक 9), डॉ. दादा कोद्रे (प्रभाग क्रमांक 15), वृषाली कामठे (प्रभाग क्रमांक 40), संदीप बेलदरे (प्रभाग क्रमांक 38) या उपनगरांमधील नगरसेवकांना भाजपने संधी दिली आहे.
भाजप नेत्यांविरुद्ध दंड थोपटून महापालिका निवडणुकीत निवडून आलेले अमोल बालवडकर (प्रभाग क्रमांक 9) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्याच वर्षी संधी दिली. त्याच बरोबर वैशाली बनकर (प्रभाग क्रमांक 16), राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे (प्रभाग क्रमांक 2) यांना संधी दिली आहे. तर स्थायी समितीमध्ये काँग्रेसतर्फे प्रशांत जगताप (प्रभाग क्रमांक 18) यांना पक्षाने संधी दिली आहे.
पुणे महापालिकेमध्ये महापौर पद हे सर्वोच्च आहे. त्यामुळे त्या पदावर काम केलेल्या व्यक्तीने अन्य कोणतेही पद किंवा समितीमध्ये काम करू नये असे संकेत आहेत. पण राष्ट्रवादी व काँग्रेसने या संकेत बाजूला ठेवत माजी महापौर वैशाली बनकर, प्रशांत जगताप यांना स्थायी समितीमध्ये पाठवले आहे.
भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. त्यामुळे दोन, तीन वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना संधी दिली नाही. त्याऐवजी नव्यांना पहिल्याचवर्षी संधी दिल्याने अनेक इच्छुक नाराज झाले. तर तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांना पक्षाने संधी दिल्यने निष्ठावंत नगरसेवक नाराज झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.