Pune News : कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने पोर्श कार चालवून दोन अभियंत्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची आणि त्याच्या आईची पोलिसांनी चौकशी केली. मात्र या चौकशीत पोलिसांना असहकार्य करत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिस अधिकारी चांगलेच त्रस्त झाले आहेत. या अपघात प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने या अपघात प्रकरणात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आरोपीला शनिवारी सकाळी ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दारु पिऊन आपल्या ताब्यातील पोर्श गाडी भरधाव वेगाने चालवून एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. कल्याणीनगर येथे झालेल्या या अपघात प्रकरणात पुणे (Pune) पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर खडबडून जागे होत पुणे पोलिसांनी सुत्रे हलवित या अल्पवयीन मुलाचे वडील, आजोबा यांच्यासह ससून रूग्णालयातील दोन डॉक्टर , एक शिपाई यांना अटक केली आहे.
या अपघातप्रकरणाच्या तपासासाठी या आरोपीची आई शिवानी अगरवाल यांना पोलिस चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र शिवानी अगरवाल या फरार झाल्या होत्या. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास पथके नेमली होती. मात्र त्या सापडत नव्हत्या. अखेर शनिवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने शिवानी अगरवाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या उपस्थितीत या अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात आली. या मुलाला ठेवण्यात आलेल्या बालसुधारगृहात जाऊन पोलिसांनी ही चौकशी केली. यासाठी विशेष परवानगी काढण्यात आली होती.
बालसुधारगृहात जाऊन पोलिसांनी आई शिवानी आणि अल्पवयीन आरोपी या दोघांनी समोरासमोर चौकशी केली. सुमारे दीड तास ही चौकशी करण्यात आली. यामध्ये या अल्पवयीन मुलाला पोलिसांकडून (Police) घरातून किती वाजता निघाला, ज्या पबमध्ये हा मुलगा दारू प्यायला होता. त्या कोझीज् आणि ब्लॅक बार मध्ये काय घडलं, गाडी चालवत असताना गाडीचा वेग किती होता. किती वाजले होते. यासह त्यावेळी गाडीत किती जण होते, असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र यातील बहुतांश प्रश्नांवर या मुलाने उडावीउडवीचीच उत्तरे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मुलाच्या आई शिवानी अगरवाल यांनी देखील पोलिसांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस त्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांना अटक केली असून त्यांच्याकडे ससून मध्ये ब्लड सॅम्पल बदलणे, पुरावे नष्ट करणे, ड्रायव्हरचे अपहरण या प्रकरणातील सहभाग याबाबत सविस्तर तपास केला जाणार आहे. या चौकशीमध्ये पोलिसांच्या हातात सबळ पुरावे लागल्यास त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करून त्यादृष्टिने तपास केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.