
Pune News : पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या आडमुठेपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. रुग्णालयाने आधी दहा लाख भरण्यास सांगितल्याने त्यांना तिथून हलविण्यात आल्याचेही कुटुंबीयांनी म्हटले आहे. पण रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालामध्ये तीन प्रमुख निष्कर्ष काढण्यात आले असून ते धक्कादायक आहेत. Advance मागितल्याच्या रागातून तक्रार करण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय सल्लेही मानले नाहीत, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.
वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून दाखल होण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी पाळला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि Advanve मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे, असे समितीचे मत आहे.
रुग्णासाठी Twin Pregnancy धोकादायक होती. माहितीचे रुग्णालय असूनही ANC चेकअपसाठी पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत, असा निष्कर्षही समितीने काढला आहे. तनिषा भिसे या 2020 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला देण्यासाठी येत होत्या. त्यांची 2022 मध्ये रुग्णालयात 50 टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया केली होती, अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.
2023 साली या रुग्णाला सुखरुप गर्भारपण व प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता. आई व बाळाच्या सुरक्षेसाठी प्रसुतीपूर्व तपासणी (एएनसी) कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते. ती त्यांनी या रुग्णालयात केली नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही, असा खुलासाही रुग्णालयाने केला आहे.
संबंधित रुग्ण, पती व नातेवाईक 28 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले होते. जोखमीची अवस्था लक्षात घेऊन निरीक्षणासाठी भरती होण्याचा सल्ला दिला. तसेच धोक्याची माहिती दिली. कमी वजनाची 7 महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिने एनआयसीयूचे उपचार लागतील हे समजावून सांगितले व 10 ते 20 लाख खर्च येऊ शकतो, याची कल्पना दिली.
रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉ. केळकर यांना फोन करून अडचण सांगितली. त्यावर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा, असे सांगितल्याचा खुलासा रुग्णालयाने केला आहे. पण नंतर रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक तिथून गेल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.