
Pune News : पुणे जिल्ह्यात असणाऱ्या यवत मध्ये सगळं काही सुरळीत सुरू असताना गेल्या आठवड्याभरापासून यवत नक्की का धुमसतय? यवतमधील सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचं काम नक्की कोण करतय? काल झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता का? आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून यवतमध्ये मोठा हिंसाचार उफाळून आला... याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय, पण यवत (Yavat) नक्की कोणी पेटवलं? असे प्रश्न सगळ्यांनाच पडले आहेत.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात शुक्रवारी(ता.1) तणाव निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली. याची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यवतमधील तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत.
पश्चिम महाराष्ट्राला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा मोठा वारसा आहे. त्यात यवत हे गाव सामाजिक सलोखा टिकवणारं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची अशाप्रकारे विटंबना झाल्यावर भावना उफाळून येणं स्वाभाविकच होतं. पण सामाजिक सलोख्याचा जाज्ज्वल्य इतिहास असणाऱ्या यवतमध्ये या प्रकरणानंतर एक ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेत एका दारुड्यानं हा संताजनक प्रकार केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर दोन्हीही बाजूकडून तीव्र संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला गेला. पण हे प्रकरण इथे थांबणार नव्हतं.
गावपातळीवर सगळं वातावरण शांत झालं होत. जनजीवन पूर्वपदावर येत होत. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू जनआक्रोश मेळावा पार पडला. गावात तशी वर वर शांतता होती... निखारे विझले होते. या विझलेल्या निखाऱ्यावर फुंकर घालायचं काम केलं ते पडळकर आणि जगताप यांच्या भाषणांनी केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
31 जुलैला संध्यकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही सभा संपली. त्यानंतर एका तरुणाने एक पोस्ट केली आणि ती या आगीत तेल ओतणारी ठरली. अखेर दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास हिंसाचार सुरु झाला. सोशल मीडियावर पोस्ट वायरल झाल्यामुळे मूळ वाद तेजीत वाढला. गावात 30–40 लोकांचा मोर्चा वेगाने वाढला, वाहनं जाळण्यात आली, एक मोटरसायकल जाळण्यात आली, दुकानं, घरं, धार्मिक स्थळे आणि यांच नुकसान करण्यात आले. काही भागात दगडही फेकण्यात आले.
हा सगळा हिंसाचार सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे पुण्यातच होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात येणार होतंं. त्या कार्यक्रमासाठी हे सगळे नेते पुण्यात होते. कार्यक्रम सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस अन अजित पवार यांना या हिंसाचाराची माहिती मिळाली. पोलिसांकडून गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस यांनी संपूर्ण ब्रीफिंग घेतलं. तर पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार यांनी कार्यक्रम संपताच थेट यवत गाठलं.
26 जुलै रोजी एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप आहे
संबंधित तरुण हा दारुड्या असून त्याने मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केल्याचा संशय
तरुणाचा मोबाईल आणि चप्पल देखील घटनास्थळीच आढळून आल्याचा दावा
30 जुलैच्या रात्री पोलिसांनी आरोपीच्या घरामागे असणाऱ्या उसाच्या शेतातून त्याला अटक
31 जुलै 2025 आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मेळावा. यानंतर रात्री एका तरुणाने आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली.
1 ऑगस्ट 2025: पोस्ट व्हायरल झाल्याने हिंसाचार उफाळला; दगडफेक, जाळपोळ आणि धार्मिक स्थळांवर हल्ले. पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करून जमाव पांगवला.
पोलिस कारवाई: आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला अटक, 500 हून अधिक जणांवर 5 FIR दाखल, 17 जणांना ताब्यात. धारा 144 लागू, इंटरनेट सेवा बंद.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.