

Someshwar News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळविल्यानंतर आता कारखान्याच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी अनुभवी संचालक राजवर्धन शिंदे यांच्यावर सोपवली आहे. तर, उपाध्यक्षपद संग्राम सोरटे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे.
राजवर्धन शिंदे यांनी यापूर्वी दोन वेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. संचालक म्हणून त्यांची ही चौथी टर्म आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, कारखान्याच्या कामकाजाची जाण आणि सभासदांशी असलेला संपर्क या पार्श्वभूमीवर त्यांची निवड झाल्याची चर्चा आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर वेगवेगळ्या नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. अनुभवी नेत्याला संधी द्यायची की नवीन चेहरा समोर आणायचा याविषयी चर्चा होती.
यामध्ये राजवर्धन शिंदे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड यांच्या देखील नावांची चर्चो होती. मात्र, अखेर राजवर्धन शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या चर्चेतही त्यांच्या नावाचा समावेश होता. मात्र, अखेर त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा परिचय असून, या निवडीमुळे कारखान्याच्या नेतृत्वात त्यांनाही महत्त्वाची भूमिका मिळाली आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा निर्णय झाल्यानंतर आता कारखान्याच्या दोन स्वीकृत संचालकांच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे जुळविताना अनेक इच्छुकांना संधी देता आली नव्हती. त्यामुळे या दोन जागांवर कोणाला संधी मिळणार, याबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नव्या नेतृत्वासमोर कारखान्याचा आर्थिक कारभार मजबूत करणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देणे, गळीत हंगामाचे नियोजन, उत्पादन क्षमता आणि पारदर्शक प्रशासन अशी अनेक आव्हाने असणार आहेत. २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळविल्यानंतर आता या संचालक मंडळाच्या कामगिरीकडे सभासद आणि ऊस उत्पादकांचे लक्ष राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.