

Pune News, 18 Oct : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमध्ये आता अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती प्रमोद काकडे आणि नवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संग्राम सोरटे या तिघांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
त्यामुळे कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार विकास पॅनेल’ने निवडणुकीत सर्व २१ जागांवर विजय मिळविला.
या एकतर्फी विजयामुळे कारखान्यावरील पॅनेलचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. मात्र, आता अध्यक्षपदासाठी कोणाला संधी मिळणार, यावरून सहकार क्षेत्रातील चर्चांना वेग आला आहे. प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत सुनेत्रा पवार यांनी अध्यक्ष निवडताना सर्वांना विचारात घेतले जाईल, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे अनुभव, संघटनात्मक काम आणि राजकीय समीकरणे यांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
या नावांची चर्चा
अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यामुळे त्यांना कारखान्याच्या कामकाजाचा अनुभव आहे. अजित पवार यांच्या सूचनेनुसार त्यांनी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. बारामती तालुका दूध उत्पादक संघातील अनुभव, जनसंपर्क आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शैली या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. त्यामुळे अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी मिळणार का, याकडे लक्ष आहे.
काकडे, सोरटेंच्या नावांचीही चर्चा
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती प्रमोद काकडे यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. जिल्हा परिषदेतील कामाचा अनुभव आणि कारखान्याचे संचालक म्हणून केलेले काम यामुळे त्यांची दावेदारी महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे, नवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संग्राम सोरटे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या तिघांपैकी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय घेताना सुनेत्रा पवार कोणत्या निकषांना प्राधान्य देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजयापेक्षा आता अध्यक्षपदाच्या निवडीचीच चर्चा सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
१४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट; नव्या अध्यक्षांची कसोटी
अध्यक्षपदावर कोणाची निवड होते, यापेक्षा त्या व्यक्तीसमोर असलेली जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. कारखान्याने यंदा १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. मात्र, राज्यातील साखर उद्योगासमोर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट असून, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे जिरायती आहेत. त्यामुळे पाण्याची उपलब्धता आणि उसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत उपलब्ध उसाचे व्यवस्थापन, ऊसतोडणीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि शेतकऱ्यांशी समन्वय साधणे, ही नव्या अध्यक्षांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. कारखान्याचे आर्थिक हित जपत ऊस उत्पादकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल. त्यामुळे सोमेश्वरच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होते, याची उत्सुकता असतानाच आगामी गाळप हंगामात कारखान्याचा कारभार कसा चालतो, यावर नव्या नेतृत्वाची कामगिरी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.