Baramati Political News : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी सरकारला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे, तर सरकारकडून धनगर समाजाला दिलेली ५० दिवसांची मुदत दोन दिवसात संपत आहे. या काळात सरकारने आरक्षणाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात धनगर समाजाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला बुधवारी आमदार राम शिंदे यांनी भेट देऊन आरक्षणाबाबत चर्चा केली. (Latest Political News)
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे अण्णासाहेब रुपनवर यांनी उपोषण केले होते. या आरक्षणाबाबत सरकारने ५० दिवसांची मुदत मागितली होती. ती आता संपुष्टात आली तरी शासनस्तरावर ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप धनगर समाजाने केला. यानंतर बारामतीत धनगर समाजातील युवकांकडून आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. येथे सात दिवसांपासून चंद्रकांत वाघमोडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनकर्त्यांची आमदार शिंदेंनी भेट घेतली.
यावेळी राम शिंदेंनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही दिली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून लवकरच यातून मार्ग काढण्याचे आश्वासनही दिले. सरकारने दिलेला कालावधी हा दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे सरकारने याची दखल घेणे आवश्यक होते. मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समाजाच्या युवकांनी केला. यावर शिंदेंनी आरक्षणाबाबत ठोस पावले उचलण्यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
याबाबत उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे म्हणाले, 'दिलेल्या मुदतीत शासनाने धनगर समाजाला एसटी प्रवार्गातील आरक्षणाबाबत निर्णय घेणे अपेक्षीत असतनाही दुर्लक्ष केले. आमदार शिंदेंनी आमची भेट घेऊन आरक्षणाबाबत सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे म्हणाले. सध्या दिवाळी असल्याने ते लवकरच समाजाची भूमिका सरकारपर्यंत पोहचवतील. या उपोषणाला आमदार शिंदेसह खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाठिंबा दिला,' असे वाघमोडेंनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी सोमवारी धनगर उपोषणकर्त्यांशी भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सुळेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला होता. तसेच ऐन दिवाळीत आंदोलन करू नका, अशी विनंतीही केली होती. मात्र सरकारकडून ठोस अश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांसह कार्यकर्त्यांनी घेतली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.