
Pune News: विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यानंतर भाजपकडून शपथविधीचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. असं असलं तरी अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या सस्पेन्स कायम आहे.
मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं बोललं जात असलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून धक्का तंत्राचा वापर करत काही नवीन नाव समोर येणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी 'या लोकनेत्याला मुख्यमंत्री केल्यास चांगलं होईल असं वक्तव्य केलं आहे.
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार (Rohit Pawar) बोलत होते.अजित पवार हे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं रिपोर्ट कार्ड घेऊन दिल्लीमध्ये गेले असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं हे त्या पक्षाचा प्रमुख ठरवत असतो.
अजितदादांच्या किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून कोणाला मंत्री करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं मात्र सध्या अप्रत्यक्षपणे भाजपच या दोन्ही पक्षातील कोणाला मंत्री करायचं हे ठरवत आहे असं दिसत आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अशा नेत्यांना भाजप (BJP) मंत्री करू इच्छितो जे पूर्वी भाजपामध्ये होते, अथवा ते भाजपच्या संपर्कामध्ये आहेत किंवा ते भाजपाच्या बाजूने झुकलेले आहेत. त्यांना मंत्रीपद देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या जवळच्या नेत्यांना डावलण्याच राजकारण भाजपाकडून करण्यात येत असल्याचे दिसत आहे. या माध्यमातून भाजप 2029 मध्ये स्वबळावर सत्ता आणण्याच्या तयारीत लागला असल्याचं रोहित पवार म्हणाले.
सध्या भाजपच्या बाजूने 137 आमदारांचं पाठबळ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले नाहीत तरी अजित पवारांच्या (Ajit Pawar) सोबतीने भाजप सरकार स्थापन करू शकतो. तसेच जर अजित पवार नाराज झाले तर भाजप शिंदेना सोबत सत्ता स्थापन करू शकतो. त्यामुळे हरियाणा सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते. गेले पाच वर्ष हरियाणामध्ये भाजपने ज्या मित्र पक्षासोबत सरकार स्थापन केलं होतं. आता त्या मित्र पक्षाच अस्तित्व दिसत नाही. त्यामुळे सोबत घेऊन लोकनेत्यांना आणि पक्षांना संपवण्याचा राजकारण भाजप करत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अद्याप मुख्यमंत्री कोण? होणार याबाबत निर्णय झालेला नाही त्यावरती बोलताना रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मुख्यमंत्री पदसाठी नाव अद्याप जाहीर झाले नाही. मात्र ते केंद्रातील नेत्यांच्या विरोधात जातील असं वाटत नाही ते हुशार नेते आहेत. त्यांना अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद माहिती आहे. त्यामुळे केंद्रातील वरिष्ठ हे देवेंद्र फडणवीस यांना संधी देतात की दुसरा चर्चेत असलेलं नाव म्हणजे पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार हे पाहावं लागेल.
देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला संधी न देता पंकजा मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याला संधी दिली जाते का? हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पंकजा मुंडे या लोकनेत्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षात त्यांची ताकद ही भाजपनेच कमी केली आहे. मात्र जर एखाद्या लोकनेत्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी संधी दिली आणि त्या पंकजा मुंडे असतील तर ती चांगली गोष्ट आहे. इतरही भाजपचे नेते मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये असून नेमक पंकजा मुंडे यांना संधी दिली जाते का नाही पाहावं लागेल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.