Baramati News: महाराष्ट्रात विशेषतः बारामती आणि मराठवाड्यानंतर आता राज्यातील उर्वरित भागांतही हळूहळू शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला जात आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेणे आता सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर बारामतीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे.
बारामतीतील गोविंद बाग येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ साधता येऊ शकते, याचा प्रत्यय आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गोविंद बागेत यंदा एकरी सरासरी 120 टन ऊस उत्पादन मिळाले आहे. गेल्या 15 वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत एकरी तब्बल 60 टनांची वाढ झाल्याने AI आधारित शेती प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे.
शेतीमध्ये बदलते हवामान, पाण्याचे नियोजन, खतांचा संतुलित वापर, पिकांवरील रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि जमिनीची सुपीकता या बाबी उत्पादनावर मोठा परिणाम करतात. या सर्व घटकांचा अभ्यास करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. गोविंद बागेत ऊस पिकासाठी या आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्याने उत्पादनवाढीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
गेल्या 15 वर्षांतील गोविंद बागेच्या ऊस उत्पादनाचा सरासरी आकडा एकरी सुमारे 60 टन होता. मात्र, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदा एकरी सरासरी 120 टन उत्पादन मिळाले असून, पूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती अधिक उत्पादक आणि फायदेशीर होऊ शकते, हे अधोरेखित झाले आहे.
ऊसशेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास पाण्याची बचत, खतांचा योग्य वापर, पीक व्यवस्थापनातील अचूकता आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. गोविंद बागेतील हा प्रयोग बारामतीसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीची नवी दिशा देणारा ठरू शकतो.
शेतकऱ्यांना आधुनिक AI तंत्रज्ञानामुळे जमिनीतील ओलावा आणि पोषक तत्वांचे सेन्सर्सद्वारे निरीक्षण करून पिकाला नेमके किती पाणी आणि खत अपेक्षित आहे, याचा बऱ्यापैकी अचूक अंदाज मिळण्यास मदत होत आहे.
याचबरोबर पिकांचे फोटो किंवा ड्रोन इमेजिंग तपासून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखला जातो. ज्यामुळे वेळीच उपाययोजना करता येते. ऐतिहासिक हवामान डेटा आणि सद्यस्थितीचे विश्लेषण करून पावसाचा अचूक अंदाज आणि संभाव्य उत्पन्नाचे प्रमाण लक्षात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.