

Pune News : गेल्या तीन गाळप हंगामांपासून बंद असलेला शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. कारखान्याला अर्थसाहाय्य मिळण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला (एनएसडीसी) दिलेल्या कर्जाच्या प्रस्तावातील त्रुटी तातडीने दूर करून सुधारित प्रस्ताव पुन्हा द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिल्या.
घोडगंगा कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत मुंबईत बैठक झाली. त्यात त्या बोलत होत्या. कारखाना बंद असल्याने शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार, लघुउद्योजक तसेच कारखान्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांवर परिणाम होत आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक अर्थसाहाय्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘‘कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी ‘एनएसडीसी’कडे यापूर्वी कर्जाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, प्रस्तावात काही त्रुटी आढळल्याने तो परत आला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रस्तावातील सर्व त्रुटींची पूर्तता करून सुधारित कर्जमागणीचा प्रस्ताव तातडीने नव्याने द्या. कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कारखाना व्यवस्थापनाची बैठक त्वरित आयोजित करावी.’’
या बैठकीस सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार माउली कटके, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे (ऑनलाइन), साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, राजेंद्र कोरेकर, रवी काळे उपस्थित होते. त्याचवेळी बैठकीला कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार व माजी अध्यक्ष तथा माजी आमदार अशोक पवार तसेच व्यवस्थापनातील अन्य कुणालाही बोलविले नाही. त्यावरून तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
कारखाना प्रशासन पातळीवर व पदाधिकारी म्हणून ऋषिराज पवार व अशोक पवार यांचेसह कारखाना पदाधिकारी कर्ज मंजुरीसाठी प्रयत्न करत असतानाच मुंबईत याच विषयावर बैठक बोलावली गेली; परंतु त्यात त्यांना न बोलवता बैठक घेतली गेली. मात्र, सदर प्रस्ताव सरकारकडून स्वीकारण्यासाठी कारखाना व्यवस्थापनासोबत बैठक घेण्याचे थेट आदेश पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांनी दिले.
याप्रश्नी मी उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना भेटलो असून, त्यांनी यापूर्वीच कारखाना सुरू करण्याबाबत सर्व कार्यवाही करण्याची ग्वाही दिलेली आहे. आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आता मी पुन्हा त्यांना सकारात्मक भूमिकेतून भेटून कारखाना लवकर कसा सुरू होईल, याबाबत प्रयत्नशील आहे, असे अशोक पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.