Pune News : पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यामध्ये एवढं मोठं ड्रग्ज रॅकेट सापडणं हे गृहमंत्रालयाचे अपयश असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. आता या प्रकरणावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Pune Drugs Racket News)
संजय मोरे म्हणाले, 'पुणे हे खरंतर शिक्षणाचे माहेरघर आहे. मात्र, आता ते ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय हब तयार झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात ड्रग्जची निर्मिती होत आहे का ? असे वाटू लागले आहे. त्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीही ड्रग्जच्या विळख्यात अडकू लागले आहेत.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ललित पाटील प्रकरण ताजे असतानाच पुणे शहरात 1 हजार 850 किलो एमडी ड्रग्ज आणि पुण्यामधून राजधानी दिल्लीत पाठवलेले 970 किलो ड्रग्ज सापडले आहे. आणखीन किती राज्यामध्ये पुण्यात तयार झालेले ड्रग्ज पाठवले, हे लवकरच कळेल. परंतु आता पकडलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास चार हजार कोटींपेक्षा जास्त आहे. ही भारतातील सर्वात मोठी कारवाई आहे. मग हीच का मोदी साहेबांची गॅरंटी ? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
या कारवाईबाबत पुणे पोलिस आयुक्तांचं आणि पोलिस बांधवांचं या कामगिरीबाबत अभिनंदन ! पण पालकमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांचा वचक राहिलेला नाही, असं प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे पालकमंत्री अजितदादा पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटून नाही तर गाडी अडवून याबाबत शिवसेनेच्या वतीने आम्ही नक्कीच विचारणा करणार आहोत, असंही ते म्हणाले.
ड्रग्ज विक्रीसाठी पुणे शहरातील सर्वात मोठे आणि सहजतेने उपलब्ध असलेले ठिकाण म्हणजे पुण्यातील वाढलेले पब व हुक्का पार्लर. तसेच इतर राज्यांतील विद्यार्थी आणि आयटी नोकरदार हे ड्रग्ज रॅकेटवाल्यांचे मुख्य गिऱ्हाईक आहेत. पबमध्ये व हुक्का पार्लरमध्ये ड्रग्जचे वितरण सहजतेने होत असल्यामुळे पब मालकांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी असल्याचं मोरे यांनी सांगितलं.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र राज्यातील रोजगार पर राज्यात गेले आणि तरुणांच्या हातात अमली पदार्थ सहजपणे येऊ लागले. तरुणांसाठी हाच रोजगार आता उपलब्ध आहे का ? तसेच पुणे शहरामध्ये रोज 50 कोटींचा गुटखा विकला जातो. यावर दोन वेळा आवाज उठवून झाला, परंतु यावर ना सरकारचा अंकुश, ना पालकमंत्र्यांचा, ना पोलिसांचा. त्यामुळे पुणे हे नशेडी शहर म्हणून ओळखले जाईल का ? याची भीती वाटू लागली आहे. अमली पदार्थ विकून झटपट बक्कळ पैसा कमावण्याच्या नादात पुण्यातील गुन्हेगारी वाढली असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.