Pune Politics : पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून राजकारण पेटले आहे. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे नाव पहिला बाजीराव पेशवा करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच संभाजी ब्रिगेडकडून याला कडाडून विरोध करण्यात आला. आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनर लावत मेधा कुलकर्णींचे नाव न घेता टीका करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये म्हटले आहे की, 'कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा.' शहरात विविध ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे बाजीराव पेशवे यांचं ज्या शनिवारवाड्यात वास्तव्य होतं. त्याच्या जवळ देखील हा बॅनर लावण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते वसंत मोरे यांनी या नामांतराच्या मुद्यावर यापूर्वी भाष्य करताना म्हटले होते की, रेल्वे स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीकडे, सुरक्षा यंत्रणे कडे दुर्लक्ष होत आहे. पुण्यातील दोन खासदारांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या बाबतच्या असुविधांवर काम करणे आवश्यक असताना फक्त अशा प्रकारचे नावांचे प्रस्ताव दिले जात आहेत. हे दुर्दैवी आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर आत्तापर्यंत ज्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अनेक मुली त्या रेल्वे स्थानकावरून गायब झाले आहेत. याकडे आधी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
मेधा कुलकर्णींनी रेल्वेच्या बैठकीत थोरले बाजीराव पेशवा यांचे नाव देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचा भव्य विस्तार केला. शनिवारवाडा हे त्यांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. पुणे हे त्या काळात स्वराज्याचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावं, ही आमची स्पष्ट आणि योग्य अशी मागणी आहे.
मेधा कुलकर्णींच्या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपचा ओठात काय आणि पोटात काय आहे? हे समोर आले आहे, अशी टीका केली. तसेच महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, धर्मवीर संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखी खूप सारी नावं असताना थोरले पेशव्यांच्या नावावर आग्रह मेधा कुलकर्णी यांनी केली. यातूनच भाजपला पुण्यात पुन्हा पेशवाई आणायची आहे का? असा सवाल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.