Pune News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकत्रच निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला आहे.
मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा लढविण्यावरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप ( Prashant Jagtap ) यांच्यासह माजी नगरसेवक योगेश ससाणे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. तर महाविकास आघाडीत मित्र पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी दंड थोपटले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 'मशाल' घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यामुळे या मतदारसंघात उमेदवार देण्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे ( Chetan Tupe ) निवडून येत आमदार झाले होते. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आमदार तुपे यांनी अजितदादा पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप हे उमेदवार असतील, असे शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच जाहीर केले आहे. जगताप यांच्यासह माजी नगरसेवक योगेश ससाने विधानसभेसाठी इच्छुक आहेत.
त्यातच आता या मतदारसंघातून शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभेसाठी कामाला लागा, अशा सूचना आपल्याला दिल्याचा दावा बाबर ( Mahadev Babar ) यांनी केला. "हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या भागातील अनेक निष्ठावान पदाधिकारी, शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आहेत. आदेश आल्यानंतर हडपसर मतदारसंघात 'मशाल' पेटविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही," असे बाबर म्हणाले.
"लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्यात यशस्वी झाले आहोत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कामाला लागा," अशा सूचना दिल्याचे बाबर यांनी म्हटलं.
"गेल्या दहा वर्षापासून आम्ही सत्तेत नसल्याने या भागातील अनेक प्रश्न आजही प्रलंबितच आहेत त्यावर ठोस उपाय योजना झालेल्या नाहीत. आमदारांनी हडपसरमधील वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कात्रज बाह्यवळण असे प्रश्न सोडविलेले नाहीत. त्यामुळे हडपसरकरांना आता आश्वासने नको, काम हवे आहे," असेही माजी आमदार महादेव बाबर यांनी स्पष्ट केले.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.