PMC News : श्रीनाथ भिमालेंना 'शहर विद्रुपीकरण पुरस्कार', वाढदिवसालाच आयुक्तांकडून अनोख गिफ्ट?

Shrinath Bhimale City Defacement Awards : पुणे महापालिकेच्या शहर विद्रुपीकरण पुरस्काराची घोषणा झाली असून, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह भाजपचे अतिक्रमणविरोध आंदोलन करणारे नगरसेवक सुनील पांडे आणि पृथ्वीराज सुतार यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Shrinath Bhimale City Defacement Awards PMC
Shrinath Bhimale City Defacement Awards PMCsarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजी रोखण्यासाठी पुणे महापालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या मोहिमेचा पहिलाच फटका सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बसला आहे. शहर विद्रुपीकरण पुरस्काराच्या पहिल्याच यादीत स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांची नावे झळकली आहेत. विशेष म्हणजे, आज श्रीनाथ भिमाले यांचा वाढदिवस असतानाच त्यांना शहर विद्रुपीकरण पुरस्कार जाहीर झाल्याने आयुक्तांकडून मिळालेल्या या 'गिफ्ट'ची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पुणे महापालिकेने शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीविरोधात २४ नोव्हेंबरपासून 'भाऊ, फ्लेक्स काढा!' ही मोहीम सुरू केली आहे. वाढदिवस, शुभेच्छा, राजकीय कार्यक्रम आणि प्रसिद्धीच्या नावाखाली चौकाचौकांत झळकणाऱ्या फ्लेक्सवर आता महापालिकेने थेट डिजिटल पद्धतीने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे फोटो महापालिकेच्या पोर्टलवर अपलोड करता येणार असून, सर्वाधिक फ्लेक्स आढळणाऱ्यांची नावे 'शहर विद्रुपीकरण पुरस्कार' म्हणून जाहीर केली जात आहेत.

या नव्या उपक्रमाच्या पहिल्याच यादीत सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे आल्याने महापालिकेच्या कारवाईची चर्चा अधिक रंगली आहे. अतिक्रमणांविरोधात आवाज उठवणारे आणि शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलन करणारे भाजपचे नगरसेवकच आता अनधिकृत फ्लेक्सबाजीच्या यादीत आल्याने प्रशासनाच्या मोहिमेने राजकीय भेदभाव न करता थेट सत्ताधाऱ्यांनाच आरसा दाखविल्याचे चित्र आहे.

Shrinath Bhimale City Defacement Awards PMC
Pune Scam: पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये मोठा भरती घोटाळा? प्राध्यापकपदासाठी प्रत्येकी 8 ते 13 लाखांची 'डिमांड'

वाढदिवशी पुरस्काराची घोषणा...

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचा आज वाढदिवस. त्याच दिवशी महापालिकेच्या शहर विद्रुपीकरण पुरस्काराच्या यादीत त्यांचे नाव झळकल्याने या घोषणेची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर येणे, ही महापालिकेच्या कारवाईची वेगळीच बाजू ठरली आहे.

आयुक्तांचा नवा फंडा; नेत्यांचे चेहरे आता पोर्टलवर

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने शहरातील हजारो अनधिकृत फ्लेक्सवर प्रत्येक वेळी कारवाई करणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून नागरिकांच्या सहभागातून 'भाऊ, फ्लेक्स काढा!' ही मोहीम राबविण्यात येत आहे. अनधिकृत फ्लेक्सचा फोटो आणि ठिकाण नागरिकांना पोर्टलवर अपलोड करता येणार असून, संबंधित व्यक्तींच्या चेहऱ्यांनुसार फ्लेक्सची संख्या मोजून यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमात व्यावसायिक गटातील ब्रह्मप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी आणि शांतिप्रिया यांनाही शहर विद्रुपीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर व्यावसायिक जाहिरातदारांनाही प्रशासनाच्या या नव्या फंडाचा फटका बसणार आहे.

फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई

अनधिकृत फ्लेक्स आढळल्यास ते कोणतीही पूर्वसूचना न देता हटविण्यात येणार असून, त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. फ्लेक्स उभारणारी व्यक्ती, त्यावरील छायाचित्र किंवा नाव असलेली व्यक्ती, मुद्रक, जाहिरात संस्था आणि आयोजक यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ नुसार तीन महिन्यांपर्यंत कारावास, दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

एकीकडे शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने बुलडोझर चालविण्याची मोहीम हाती घेतली आहे, तर दुसरीकडे अनधिकृत फ्लेक्सबाजीविरोधात डिजिटल पोलखोल सुरू केली आहे. मात्र, या मोहिमेत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीच नावे पहिल्या पुरस्कार यादीत आल्याने, शहर विद्रुपीकरण रोखण्याच्या आयुक्तांच्या मोहिमेला आता राजकीय चर्चेची जोड मिळाली आहे. वाढदिवशी स्थायी समिती अध्यक्षांना मिळालेल्या या 'पुरस्काराची' पुण्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे.

Shrinath Bhimale City Defacement Awards PMC
PMC Action : मंत्र्यांनंतर आता नगरसेवकांच्या निकटवर्तीयांचा नंबर; 'फोनाफोनी'ला न जुमानता आयुक्तांच्या कारवाईचा बुलडोजर थेट 2027 पर्यंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.