
विजय सुराणा
Pune, 27 April : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. राज्यात आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली असली तरी कार्यकर्ते मात्र सत्तेच्या पदाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) आणि इतर शासकीय समित्यांवर वर्णी लागावी, यासाठी महायुतीमधील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या ‘गॉडफादर’मार्फत जोरदार फिल्डिंग लावली आहे. मावळ तालुक्यात सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे मावळातून महायुतीमधील कोणत्या नेत्यांना डीपीसीवर संधी दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. पुणे शहरात भाजप, तर हद्दवाढ भागासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही प्रचंड स्ट्राँग आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर जाण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. इच्छुकांनी गेली पाच महिन्यांपासून मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, नियुक्तीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीत (DPC) शहर व ग्रामीण भागातील विकासकामांच्या आराखड्यास मंजुरी दिली जाते. तसेच समितीतील सदस्यांनी सुचविलेली कामे प्राधान्याने केली जातात. हल्ली नियोजन समिती कोट्यवधींच्या कामांना निधी मंजूर केला जातो. त्यामुळे अनेक समितीवर जाण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये रस्साखेच दिसून येतो.
मागील काँग्रेस आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते, त्यामुळे मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव भेगडे यांना जिल्हा नियोजन समितीवर संधी देण्यात आली होती. पुढे शिवसेना-भाजप सरकारच्या काळात पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाजपचे अविनाश बवरे यांची नियुक्ती समितीवर केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठलराव शिंदे, तर शिवसेनेचे शरद हुलावळे यांना नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाली होती.
सुनील शेळकेंची शिफारस ठरणार महत्वपूर्ण
शिंदे-फडवणीस-पवार सरकारमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री बाळा भेगडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते सूर्यकांत वाघमारे, शरद हुलावळे यांची नियोजन समितीवर संधी दिली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री असून सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे या दोघांची भूमिका नियोजन समितीवरील नियुक्तांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
भाजपकडून कोणाला संधी?
मावळ तालुक्यातून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तीनही पक्षातून नियोजन समितीवर जाण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. आमदार राष्ट्रवादीचा, खासदार शिवसेनेचा असल्याने मावळातून नेमकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. भाजपकडून बाळा भेगडे हे कोणाचे नाव पुढे करतात, हे पाहावे लागणार आहे.
महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समिती, संजय गांधी निराधार योजना, स्वस्त धान्य महावितरक, जिल्हास्तरीय महिला व बालकल्याण, महिला पोलिस दक्षता समिती, कृषी आणि इतर समित्यांसाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.