Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट टीका करणे टाळत होते. मात्र, अलीकडे अजित पवार हे आक्रमक झाले असून त्यांनी थेट नाव न घेता शरद पवारांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी बारामतीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
अजित पवार म्हणाले, 'मी 60 वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले. वसंतदादा देखील चांगलं नेतृत्व होतं, त्यांना देखील बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाचं सरकार आले. तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला, मी तर 60 च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे', असे सांगत आता कार्यकर्त्यांनी एक बाजू धरून काम करण्यास सुरुवात करा, असे अजित पवार यांनी सांगितले होते.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुळे म्हणाल्या, 'बारामती येथे अजित पवारांनी केलेला भाषणा दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे त्यांचं ऐकतात असं सांगितलं आहे. जर खरंच पंतप्रधान दादांच्या सूचना ऐकत असतील तर दादांना विनंती आहे की, दादांनी मोदींशी बोलून राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी करावी तसेच दुधाचा, इथेनॉलचा प्रश्न मार्गी लावावा. ऊस दरवाढ, कांद्याला, कपाशीला, सोयाबीनला हमीभाव मिळावा, असे प्रश्न दादांनी दिल्ली दरबारी मांडावेत.'
ती संधी दादांनाही मिळावी
सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढे म्हणाल्या, सध्या राज्यामध्ये मराठा, मुस्लीम, लिंगायत आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी देखील राज्यामध्ये वाढली आहे. राज्यातील मोठमोठे उद्योग परराज्यात जात आहेत. या प्रश्नांवर या प्रश्नांवर अजितदादांनी पंतप्रधानांसोबत आढावा घ्यावा आणि हे सगळं जर दादांच्या मार्गदर्शनाखाली होणार असेल तर ज्याप्रमाणे 38 व्या वर्षी शरद पवार यांना बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेने राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. ती संधी दादांना देखील मिळावी, यांचा सगळ्यांनाच आनंद होईल, असा उपरोधिक टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार यांनी बारामतीच्या भाषणात कार्यकर्त्यांना आता एक बाजू धरून कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता तरी राष्ट्रवादीमध्ये दोन भाग झाले आहेत, हे आता गृहीत धरायचं का, असं सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आहेत. त्याबाबतची भूमिका आम्ही निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. संविधानाच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे अद्याप तरी आम्ही पक्षात फूट पडली आहे', असे मानणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
(Edited by Sachin Waghmare)