
Pune News, 01 March : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र ही घटना घडल्यानंतर सबंध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षारक्षक केबिनची तोडफोड करण्यात आली होती.
ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी ही तोडफोड केली होती. या तोडफोडीनंतर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरेंना चांगलंच सुनावलं आहे. स्वारगेट एसटी स्थानकात झालेली बलात्काराची घटना ही स्थानकातील सुरक्षारक्षक केबिनच्या जवळच घडली.
त्यामुळे हे सुरक्षारक्षक बलात्कार होत असताना काय करत होते? असा सवाल उपस्थित करत वसंत मोरे यांनी या बलात्काराच्या घटनेला स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था जबाबदार असल्याचा आरोप करत ही तोडफोड केली. या घटनेनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील वसंत मोरेंचं कौतुक केलं. मात्र आता अशा प्रकारची तोडफोड करणाऱ्या व्यक्तींवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, एखादा प्रकार घडल्यानंतर त्याचा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येणे आवश्यक असते. मात्र त्यापूर्वीच काहीजण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर देखील कारवाई होणार. एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराच्या काचा फोडणार का? घरातील खुर्च्या तोडणार का? असा सवाल अजितदादांनी अप्रत्यक्षपणे वसंत मोरेंना केला.
यापूर्वीच कोर्टाने सांगितलं आहे की जर कोणी सार्वजनिक मालमत्तेची नुकसान करणार असेल तर नुकसान करणारा पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्याची नुकसान भरपाई ही पक्षांकडून करून घेण्यात येते. राग हा सर्वांना येतो. मात्र राग व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. अहिंसेच्या माध्यमातून महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल हे संपूर्ण जगाला माहिती आहे.
मात्र, अशा परिस्थितीत काही जण काहीतरी अव्वाच्या सव्वा करायला लागलेत. जशी राज्याची देखभाल करण्याची जबाबदारी सर्व यांच्यावर सोपवलेली आहे. हे दाखवण्यासाठी काही अतिउत्साहात हे काही करायला लागले आहेत. त्यांच्यावर पण कायद्याच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.