Pune News: शेतीमधील वाढत्या रसायनांच्या वापरामुळे शेती, माती, पाण्याच्या आरोग्यासह मानवी आणि पशुधनाच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांवर आळा घालण्यासाठी तसेच तरुण शेतकऱ्यांना कृषी उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी जुन्नर-आंबेगाव परिसरात तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कच्या धर्तीवर रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन आणि क्लस्टर उभारण्याची मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सरकारकडे अनेकदा केली. पण त्यांच्या या मागणीची सरकारने दखल घेतली नाही.
आढळराव पाटील यांनी या प्रकल्पासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता. पण त्यांच्या या पत्राची अद्याप सरकारकडून कोणीच दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. आढळराव पाटील हे सध्या सत्तेत असणाऱ्या पक्षात आहेत. मात्र, तरीदेखील त्यांच्या मागणीकडे बेदखल होत असून, यामध्ये नेमकं कोण खोडा घालतंय, असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात येत आहे.
जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर हे तालुके कृषिप्रधान तालुके आहेत. या तालुक्यांत फळे आणि भाजीपाल्यांचे उत्पादन होत असून, या तालुक्यांमधून देशभरात भाजीपाल्याचा पुरवठा होतो. तसेच काही प्रमाणात भाजीपाला निर्यातदेखील केला जातो. पण मागील काही वर्षांपासून या तालुक्यांमध्ये रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे याचे विपरित परिणाम माती-पाणी आणि मानवी आरोग्यासह पशुधनावर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रासायनिक खतांच्या आणि किटकनाशकांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील फ्लोरिकल्चर पार्कच्या धर्तीवर जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर उभारणीची मागणी आढळराव पाटील यांनी २०१९ मध्ये केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही केली होती. तसेच फडणवीस यांच्याकडेदेखील यासंदर्भात मागणी केली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील जाहिरनाम्यातदेखील क्लस्टर उभारणीचे आश्वासन आढळराव पाटील यांनी दिले होते. पण लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. पण तरीही या मागणीचा पाठपुरावा आढळराव पाटलांनी सुरू ठेवला.
मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तर आता शिवाजीराव आढळराव पाटील हे सत्तेत असणाऱ्या पक्षात आहेत. तसेच लवकरच उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री अब्दुल सत्तार यांचीही यासंदर्भाने ते भेट घेणार आहेत, त्यामुळे त्यांची मागणी पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.